लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक विनावेतन काम करीत होते. या शिक्षकांनी अनेक आंदोलने केल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शिक्षकांना नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के वेतन सुरू केले आले आहे. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये ४० टक्के वेतन सुरू केले. मात्र, या शिक्षकांना अद्यापही वेतनाची प्रतीक्षा आहे. यामुळे शासनाने लक्ष देऊन शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे. यासाठी मुंबईतील आंदोलनासाठी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक रवाना झाले आहे.
२०२३ मध्ये दिवाळीच्या तोंडावर शिक्षकांनी अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी आंदोलन उभारले होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जानेवारी २०२४ पासून पुढील टप्पा देण्याचे आश्वासन देत आंदोलन सोडविले होते. मात्र, आठ महिन्यांचा काळ लोटूनही सरकार वेतन अनुदानाचा पुढील टप्पा मिळाला नाही. राज्यात लवकरच निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक आता आक्रमक झाले असून, मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातून गेलेले शिक्षक आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातून संघटनेच्या योगिता धांडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले आहे.
वेतन अदा करण्याची मागणीवर्षभराहून अधिक काळ लोटूनही वेतनाचा पुढील टप्पा अद्याप सुरू झाला नाही. तसेच त्रुटीमधील शाळांनी त्रुटी पूर्तता करूनदेखील अद्याप त्यांची व अघोषित शाळांची वेतन अनुदानाची यादी लागलेली नसल्यामुळे या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांचे कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची बनली आहे. त्यामुळे पुढील टप्पा तसेच वेतन अदा करण्याची मागणी केली जात आहे.