लोकमत न्यूज नेटवर्कविहिरगाव : राजुरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीमधील महसूल विभागाच्या सर्र्वेे क्रमांक १७३ मधील आराजी ०.५५ हेक्टर आर. जमिनीवर बालोद्यानाला सुरुवात करण्यात आली. मात्र या उद्यानाला शासनाकडून कोणताही निधी येत नसल्यामुळे बामणवाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्वानंद वाघमारे हे स्वखर्चातून वृक्षलागवड करुन त्यांचे संगोपन करीत आहेत. सद्यास्थितीत सदर उद्यान हिरवेगार झाले असून लहान बालकांपासून अबाल वृद्ध मोठ्या प्रमाणात या उद्यानामध्ये येत आहेत. त्यामुळे या उद्यांनाला अधिक आकर्षीत करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त या उद्यानामध्ये निम, आंबा, पिंपळ, करंजी, जांभूळ, करवंत, पाम, गुलमोहर यासह विविध फुले व वनौषधींची लागवड करयात आली आहे. त्यामुळे उद्यानाचा परिसर हिरवागार दिसून येत आहे. मुंबई येथील एका बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या आसपासची गावे दत्तक घेऊन तेथील लोकसंख्येएवढी झाडे लावावीत व संपूर्ण गाव हिरवेगार करावे, असे आवाहन केले होते. वृक्ष लागवडीच्या महायोजनेला प्रभावित होऊन सर्वानंद वाघमारे यांनी इतर नागरिकांच्या सहकार्याने, स्वखर्चातून व लोकसहभागातून वृक्षलागवड व बालोद्यानाची निर्मिती केली.उद्यानातील झाडांना उन्हापासून वाचविण्याकरिता ते स्वत: टिकेदार यांच्या घरच्या खासगी बोअरवेलमधून पाण्याचा वापर करून झाडांना देत आहेत. वाघमारे यांनी स्वत: बालोद्यानाचा एक सुंदर प्रकल्प तयार केला. त्याच्या प्रती आमदार ते पंतप्रधान यांच्यामार्फत पाठविल्या. पालकमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनावरून मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांनी या बालोद्यानाच्या जागेची तपासणी करून प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी तत्काळ पाठविण्याचे निर्देश दिले. परंतु, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बालोद्यानाची जागा महसूल विभागाची असल्यामुळे आम्ही निधी उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचे सांगितले.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हिरवेगार करण्याच्या वनमंत्र्यांच्या स्वप्नात सहभागी झालेले बामणवाडा येथील नागरिक निधीअभावी हिरमुसले आहेत. अजूनही त्यांना शासनाच्या सहकार्याची प्रतीक्षा आहे. एकीकडे शासन शेकडो वृक्षलागवडीही मोहीम राबवीत आहेत, तर दुसरीकडे स्वत: पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून वृक्षलागवडीकरिता सरसावलेल्या नागरिकांवर निधीअभावी हतबल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या उद्यानासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.
बालउद्यानाला निधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:17 PM
राजुरा शहरापासून काही अंतरावर असलेल्या बामणवाडा ग्रामपंचायत हद्दीमधील महसूल विभागाच्या सर्र्वेे क्रमांक १७३ मधील आराजी ०.५५ हेक्टर आर. जमिनीवर बालोद्यानाला सुरुवात करण्यात आली.
ठळक मुद्देवृक्षसंवर्धनासाठी उपसरपंचाची धडपड : जनप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज