तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत ही रक्कम मिळालेली नाही. ऐन शेतीच्या हंगामात सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याने त्यांच्यात मोठा रोष पाहायला मिळत आहे. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटी व बँकेच्या माध्यमातून पीककर्ज घेतले आहे. यातील काही शेतकऱ्यांनी नापिकीमुळे कर्जाची परतफेड केलेली नाही; पण कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला आहे; परंतु ३१ मार्चला नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आतापर्यंत कोणताही लाभ मिळाला नाही. मुळात या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार देण्याचा निर्णय घेतला आहे; पण अजूनही त्यांना रक्कम मिळालेली नाही. ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी लाभापासून वंचित असल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे. घोषणा करून ८ ते ९ महिन्यांचा कालावधी लोटला असतानासुद्धा शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नियमित पीककर्ज फेडून गुन्हा केला का, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रकमेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:33 AM