पडक्या घरात वास्तव्य : प्रशासनाची उदासीनता घोसरी : दारिद्रय रेषेखाली जिवन जगत असताना दैनंदिन सांजेची भ्रांत असलेल्या स्थानिक ताराबाई किसन मोहुर्ले यांचे वास्तव्याचे घर दोन वर्षापूर्वी जमीनदोस्त झाले. तरीपण ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत आपल्या कुटुंबीयांसमवेत त्या पडक्यात घरातच गुजराण करीत आहे. दारिद्र रेषेखाली असल्याने घरकुलास पात्र असूनसुद्धा प्रशासनाने संवेदनशीलता न दाखवल्यामुळे कुणी घर देता, का घर अशी म्हण्याची वेळ तारबाई मोहुर्ले या विधवा महिलेवर आली आहे. शासनाने सर्वांना मजबूत व पक्के घर बांधून देण्याचा संकल्प केला आहे. त्यानूसार रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना अशा योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतात. व त्यानूसार लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. मात्र पोंभुर्णा तालुक्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना डावलून सदन कुटुंबियाना घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याने अनेक लाभार्थी घरकुलांच्या योजनेपासून वंचित आहेत. घोसरी येथील ताराबाई किसन मोहुर्ले यांचे घर दोन वर्षापूर्वी जमिनदोस्त झाले. २००७ च्या दारिद्रय सर्वेक्षणानुसार ताराबाई किसन मोहुर्ले त्यांचे नाव दारिद्र रेषेखाली आहे. त्यांचा दारिद्रय रेषेखालील क्रमांक २६२५ असून १६ गुण आहेत. त्यानूसार त्या घरकुल योजनेसाठी पात्र आहेत. त्यामुळे आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र अजूनही त्यांना घरकूल देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना आपल्या पडक्या घरातच वास्तव्य करावे लागत आहे. (वार्ताहर)अनेकजण योजनेपासून वंचितपोंभुर्णा तालुक्यातील अनेकजणांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. या तालुक्यातील अनेकांची घरे क्षतीग्रस्त आहेत. घोसरी येथील पुरुषोत्तम पेंटा मोहुर्ले यांचे घर पडलेले आहेत. तेसुद्धा घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.
दारिद्रय रेषेखालील विधवा घरकुलाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: March 05, 2017 12:42 AM