लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात २३१ कृषीविहिरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. या जोडण्यांचा प्रश्न शासन स्तरावरून निविदा निघाल्यानंतरच मार्गी लागू शकतो, अशी माहिती आहे. आता निविदा केव्हा निघतात, याकडे लक्ष लागले आहे.नागभीड तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळांपैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. असे असले तरी सिंचनाची कोणतीही सोय ता तालुक्यात नाही. घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्यात कोणताही फायदा नागभीड तालुक्यास नाही. या तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. यावर उपाय म्हणून गेल्या काही वषार्पासून या तालुक्यातील शेतकरी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विहिरींच्या विविध योजनांचा लाभ घेत असून या विहिरींच्या माध्यमातून शेतीला ओलीत करीत आहेत. २००० ते मार्च २०१८ पर्यंत या तालुक्यातील जवळपास दोन हजार २०३ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.माहितीनुसार जवाहर विहीर योजना, जीवनधारा विहीर योजना, महाराष्ट्र ग्रामीण विहीर योजना, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना या योजनांमधील विहिरीच्या २३१ लाभार्थ्यांनी विहिरीचे काम पूर्ण करून विद्युत मंडळाकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले असल्याची माहिती आहे. या २३१ लाभार्थ्यांनी विद्युत मंडळाकडे अधिकृत वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणाला आणि नापिकीला कंटाळून या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये. या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी मिळाली तर ते आपल्या उत्पादनात निश्चितच भर घालू शकतात.५९ शेतकऱ्यांकडेच सौर जोडणीविद्युत किंवा सौर ऊर्जा जोडणी असा शेतकºयांना पर्याय असला तरी अधिकांश शेतकऱ्यांचा विद्युत जोडणीकडेच कल आहे. म्हणूनच आतापर्यंत केवळ ५९ शेतकऱ्यांनीच सौरऊर्जा जोडणीला पसंती दिली आहे. विद्युत जोडणीची डिमांड सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी १० हजार ११४ रुपए तर सौरऊर्जा संचाची डिमांड १६ हजार ५६० रुपये आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विद्युत जोडणी डिमांड एक हजार ६१८ तर सौर ऊर्जा डिमांड दोन हजार २८० रुपये आहे.
२३१ विहिरींना वीज जोडणीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 5:00 AM
घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्यात कोणताही फायदा नागभीड तालुक्यास नाही. या तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत.
ठळक मुद्देशासनदरबारी अडली योजना : ऐन हंगामात शेतकऱ्यांची सिंचनासाठी धडपड