अशोक चव्हाण : धरणा मंडपात दिला कार्यकर्त्यांना संदेशचंद्रपूर : राज्यात अनेक प्रश्न आणि समस्या खितपत पडलेल्या असतानाही सरकार आणि त्यातील मंत्री केवळ वारेमाप घोषणा देत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला रस्त्यावर उतरुन जागे करा, असा संदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची दिला.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकारात विदर्भ मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित रॅली आणि धरणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत घारड, राहुल पुगलिया, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महानगर अध्यक्ष नंदू नागरकर, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबूराव वाघमारे, आसावरी देवतळे आदी प्रामुख्याने मंचावर होते.यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, हे सरकार कामाचे नाही. जिवंतपणी शेतकरी मरणयातना भोगत असताना आत्महत्येनंतर मात्र मदत दिली जाते. पेट्रोल-डिझेलवर एक रुपया अधिभार लावून दीड हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले. मात्र शेतकऱ्यांना छदामही दिला नाही. सरकारने हा अधिभार दूर करून शेतकऱ्यांना मदत करावी. राज्यातील वनजमिनी मोकळ्या करण्याच्या सरकारच्या निर्णयावरही अशोक चव्हाण यांनी टिका केली. वनजमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी आदिवासींच्या जमिनी वृक्षारोपणाच्या नावाखाली बळकविण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, काँग्रेस आदिवासींच्या पाठिशी असल्याने घाबरु नका, असा धिर त्यांनी दिला.चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करातून जनतेवर बोझा टाकला असला तरी जनताच पराभवाच्या रुपाने उत्तर देईल, काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक मुद्दे लावून धरावे, असे ते म्हणाले. महानगर पालिकेच्या राजकारणात जे पक्ष सोडून दुसरीकडे गेले त्यांना जाऊ द्या. परत बोलाविण्याची गरज नाही. नव्यांना संधी देऊ, आहे त्यांना ताकद देऊ असे ते म्हणाले.माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सरकारवर टिका केली. केंद्रात व राज्यात काँग्रेसचा पराभव झाला असला तरी ७५ टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा विजय झाला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी पालकमंत्र्यावरही टिका केली. आदिवासींच्या वनजमिनी रिकाम्या करुन घेण्याचे सरकारचे आदेश असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान मार्गदर्शनानंतर हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. त्यानंतर स्थानिक गांधी चौकात दिवसभर धरणे दिले. (जिल्हा प्रतिनिधी)वडेट्टीवारांनी फिरविली पाठप्रदेशाध्यक्षांचा कार्यक्रम गावात असतानाही आणि विधानसभा उपगटनेते विजय वडेट्टीवार कालपासून चंद्रपुरात मुक्कामी असूनही धरणास्थळी मात्र फिरकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीची कार्यक्रमात जोरदार चर्चा होती. असे असले तरी वडेट्टीवार गटाचे मानले जाणारे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची मंचावर उपस्थिती होती.
झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला रस्त्यावर उतरून जागे करा
By admin | Published: October 09, 2016 1:27 AM