भद्रावती : तालुक्यातील पाटाळा, कोंढा, टाकळी या भागातील क्षेत्रात भूगर्भ खनिज संशोधन विभागातर्फे (डी.जी.एम.) मोठ्या प्रमाणात खनिज संशोधनाचे काम सुरू आहे. सदर भागात मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिचा दगडी कोळसा असल्याचे निष्पन्न झाले आहे. लवकरच वेकोलितर्फे कोळसा खाणीकरिता शेतजमिनी संपादित करण्यात येणार आहे. चालबर्डी, कोंढा, पळसगाव, किलोणी, कोंढा (रिठ), नंदोरी बुज., नंदोरी खुर्द, हरदाळा (रिठ), विसलोन, टाकळी, माजरी या भागातील शेतजमिनी वेकोलि भूसंपादीत करणार आहे. यासंदर्भात वेकोलिने १२ नोव्हेंबर २०१३ ला तहसिलदार भद्रावती यांना वेकोलि/मा.क्षे./ भू.महाप्र/योजना/१३/१५०३ असे पत्र देऊन या भागातील नमूना ७/१२ चा दस्तावेज मागितला आहे. वेकोलिच्या ढोरवासा आणि तेलवासा या खाणीतील कोळसा संपण्याच्या मार्गावर असल्याने वेकोलि या भागातील जमिनी तात्काळ संपादन करून कोळसा खाण सुरू करणार आहे. दिवाळीपर्यंत सेक्शन ४ ची कारवाई सुरू होईल. यात नविन भूसंपादीत धोरणानुसार दोन एकर जागेवर एका व्यक्तीला नोकरी देण्यात येणार आहे. तसेच कोरडवाहू जमीन ८ ते १० लाख, ओलित जमीन १३ ते १५ लाख या दराने वेकोलिला घेण्यासाठी कोळसा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी कर्नाटका एम्टा या खासगी कोळसा खाणीला आपल्या शेतजमिनी दलालामार्फत देऊन स्वत:ची फसवणूक करवून घेतली. या प्रकारामुळे शेतमालक कंगाल तर दलाल मालामाल, असे चित्र काही दिवसातच दिसून यायला लागले होते. आता तरी या भागातील शेतकऱ्यांनी वेकोलिला जमीन देताना दलालांमार्फत न जाता स्वत: वेकोलिशी संपर्क साधून आपल्या शेतीची विक्री करावी. जेणेकरून दलालांकडून फसवणूक होणार नाही. (शहर प्रतिनिधी)
पाटाळा-कोंढा-टाकळी भागात होणार वेकोलिची कोळसा खाण
By admin | Published: July 21, 2014 12:06 AM