घरावर पडतात ब्लास्टिंगचे दगड : करार होऊनही वेकोलिकडून अडवणूकचंद्रपूर : चंद्रपूर शहरापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावरील भटाळी या गावाच्या अंगणातच वेकोलिची खदान पोहोचली आहे. खदानीत होणारे ब्लास्टिंग, त्यामुळे घरावर पडणारे दगड, भींतींना पडणाऱ्या भेगा, शेतपिकावर साचणारी धुळ यामुळे या गावातील नागरिकांचे जीणे सध्या हैराण झाले आहे. शेतजमिनीचा करार करून घेताना गोड बोलणारे वेकोलिचे अधिकारी आता प्रत्यक्षात जमिनीचा मोबदला द्यायची वेळ आली तेव्हा वेगवेगळी कारणे सांगून गावकऱ्यांची बोळवण करीत असल्याने आता सर्वसंघटितपणे लढा देण्याचा निर्धार या गावकऱ्यांसह सिनाळा आणि परिसरातील गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वेकोलिने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले नाही, तर नागरिकांचा संताप हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.पत्रकारांच्या चमूने भटाळी गावासह परिसराला भेट दिली असता वास्तव पुढे आले. एके काळी निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने जगणारी ही गावे सध्या वेकोलिच्या आडदांड भूमिकेमुळे भयभीत झाली आहेत. भटाळी, पायली-भटाळी, सिनाळा, किटाळी, कवठी, तिरवंजा, चांदसुर्ला या गावातील गावकऱ्यांही हीच अवस्था आहे. चंद्रपूर या जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील ही गावे अधिकाऱ्यांची बेबंदशाही कशी असते, याचा अनुभव घेत आहेत. या परिसराला भेट देवून गावकऱ्यांशी चर्चा केली असता अनेकांनी आपबिती सांगितली. या गावालगत फेज वन मधील कोळशाची खाण सुरू होऊन १५ ते २० वर्षे झालीत. गावाजवळ वेकोलिची खदान आल्याचे सुरूवातीला या गावकऱ्यांना अप्रुप वाटले, मात्र ही नव्याची नवलाई ठरली. काही दिवसातच घरावर, शेतपिकांवर कोळशाची आणि ट्रकच्या वाहतुकीमुळे उडणाऱ्या मातीची धुळ साचायला लागली. उत्पन्न खालावले. (जिल्हा प्रतिनिधी)सेक्टर वन बंद पाडण्याचा गावकऱ्यांचा ईशाराआजवर जे सोसले ते पुष्कळ झाले. आता ‘आर या पार’ची लढाई करायची या इराद्याने गावकरी भटाळीतील बैठकीत पुढे सरसावले. सर्व गावकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यावर नरेश पुगलिया यांनी गावाला एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले. त्याला दाद देत गावकऱ्यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. आधी जिल्हाधिकारी आणि वेकोलिच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुदतपूर्व प्रश्न सोडवून घेण्याचे ठरले. या मुदतीत प्रशासननने दखल घेतली नाही तर, सेक्टर वन या खाणीमध्ये मुलाबाळांसह उतरून बेमुदत आंदोलन उभारण्याचे ठरले. या आंदोलनादरम्यान एकही ट्रक कोळसा गावाबाहेर जाऊ न देण्याचा निर्धार नरेश पुगलिया यांच्या उपस्थितीत या गावकऱ्यांनी केला. या लढ्यात गावकऱ्यांच्या सोबत आंदोलनात स्वत: सहभागी होण्याची घोषणा पुगलिया यांनी केली. गावातील शेतकऱ्यांसोबतच भूमिहीन शेतमजुरांनाही मोबदला मिळावा, कोरडवाहू, पडीत आणि बागायती असा स्वतंत्र दर शेतजमिनीचा लावावा, धुऱ्याचीही किंमत वेकोलिने द्यावी, नोकरी अथवा एकरी मोबदला आणि एक रकमी नुकसानभरपाई व्याजासह वेकोलिने द्यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन असेल, अशी घोषणा यावेळी पुगलिया यांनी केली.गावकऱ्यांनी मांडल्या व्यथापुगलिया यांच्यापुढे गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. मुकुंद आंबेकर म्हणाले, गावाजवळ खदान आली. खदानीपासून ३०० किलोमीटरवर प्राथमिक शाळा आहे. ब्लास्टिंगचे दगड मैदानात, अंगणात येऊन पडतात. घरांना भेगा पडल्या आहेत. हादरे बसणे नित्याचे झाले आहे. बागायती शेती असतानाही वेकोलिने कोरडवाहू दाखविली. अधिकारी ऐकायला तयार नाहीत. सरपंच मनीषा थेरे म्हणाल्या, मागील सात-आठ वर्षांपासून नोटीस मिळाल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद पडले आहेत. गावाचे भविष्य दिशाहिन झाले आहे. प्रकल्पग्रस्तांचे वय वाढत आहे. माजी पंचायत समिती सभापती गंगाधर वैद्य म्हणाले, २८ मार्चला वेकोलिने गावकऱ्यांकडून करार लिहून घेतले, मात्र पुढे बोलायला कुणी अधिकारी तयार नाही. सर्व मोबदला एकाच वेळी मिळायला हवा. सिनाळाचे श्याम रोहनकर म्हणाले, अधिकारी कारणे सांगून टाळाटाळ करतात. पायली भटाळीचे ग्राम रोजगार सेवक अरविंद उके म्हणाले, ‘धनी धुऱ्यावर आणि चोट्टा माऱ्यावर’ अशी स्थिती आहे. वेकोलिने ताब तर घेतला, मात्र आम्ही बेदखल झालो आहोत. विठोबा आमणे, विद्या चटप, सिनाळाचे उपसरपंच बंडू रायपुरे, माजी सरपंच संगीता उपरे यांच्यासह अनेकांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या.पत्नीने केला होता आत्महत्येचा प्रयत्नया गावातील संजय खाडीलकर यांची व्यथा हृदयाचा ठोका चुकविणारी होती. ते म्हणाले, शेतीवर तीन लाखांचे कर्ज होते. ते परत करता न आल्याने व्याज वाढत सहा लाख झाले. शेतीत काही पिकत नाही. त्यामुळे व्याजही फेडता येत नाही. सेक्शन फोरमुळे शेती विकताही येत नाही. बँंकेचे नोटीस घरी पोहोचले आहेत. हे बघून आपल्या पत्नीची मानसिकता बिघडली. या विवंचनेत काही दिवसांपूर्वी तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. हे किती दिवस चालणार याचा अंदाज मात्र लागत नाही.
अंगणाजवळ पोहोचली वेकोलिची खदान
By admin | Published: January 28, 2016 12:44 AM