शंकर चव्हाण ल्ल जिवतीपिढ्यान्पिढ्यापासून एकोप्याने जीवन जगणाऱ्या आदिवासी गुड्यात कुणीतरी जादुटोणा करीत आहे. त्यामुळेच गुड्यात आजाराचे प्रमाण नेहमीच घडत असल्याने त्या काळात एकाचा मृत्यु तर दुसऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले. ही जादुटोण्याचीच करामत असावी, कुणीतरी आपला छेड करतोयं, या भीतीपोटी घोडणकप्पी गुड्यातील २२ कुटुंबांनी शासनाने दिलेल्या घरकुलाचा थारा सोडल्याची घटना मागील आठ महिण्यापूर्वी भारी ग्रामपंचायत मधल्या घोडणकप्पी गावात घडली आहे. २९ कुटुंब व १५२ लोकसंख्या असलेल्या या गुड्यात आजच्या स्थितीत सातच कुटुंब वास्तव्यास असून तेही दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. मात्र आजपर्यंत या गंभीर घटनेची दखल कुणीही घेतले नसल्याचे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या आॅन द स्पॉट भेटीत पाहायला मिळाले. भारी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या घोडणकप्पी या गुड्यात गेल्या अनेक वर्षापासून एकोप्याने राहणाऱ्या आदिवासी बांधवांना प्यायला पाणी नाही, जायला धड रस्ता नाही, जवळपास दवाखाण्याची सोय नाही, दोन शिक्षकी जिल्हा परिषदेची शाळा असलेल्या या गुड्यात विद्युत खांब आहे. मात्र चार महिन्यापासून वीज नाही, अशा अनेक समस्या आवासून उभ्या असतानासुद्धा संपूर्ण कुटुंबात, गावात आनंदाचे वातावरण राहायचे. मात्र या गावाला कुणाची दृष्टच लागली काय, गावात जादुटोण्याच्या संशयाचे भूत निर्माण झाले व काही दिवसातच शासनाच्या योजना सोडून २२ कुटुंबांनी स्थलांतरित होऊन दोन किमी अंतरावर वास्तव्य करीत असल्याचा गंभीर प्रकार पाहायला मिळत आहे.एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असले तरी पहाडावरील काही गावात अंधश्रद्धेवरचा विश्वास कायम आहे. छोट्या-मोठ्या आजारावर ते घरीच उपचार करताना पाहायला मिळते. मागील एक दोन वर्षापूर्वी जादुटोणा करीत असल्याच्या कारणावरुन सोरेकासा येथील पती-पत्नीचा दगडाने ठेचून शेतात हत्या झाली. तेव्हापासून गावकऱ्यांच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचे भूत बसले असून यावर जनजागृती करण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हालसध्या घोडणकप्पी गावात वास्तव्यास असलेल्या सात कुटुंबापैकी रामु आत्राम या आदिवासी बांधवासोबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने चर्चा केली असता ते म्हणाले, गावात रस्ता, वीज व पिण्याच्या पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत होती. मार्चनंतर गावात आंघोळीचे पाणी तर सोडाच प्यायलाही पाणी मिळत नाही. त्यामुळे त्या नागरिकांनी कंटाळून गाव सोडल्याचे सांगितले.हातपंपही दुर्लक्षित४गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर गावात शासनाने हातपंप खोदले. मात्र गेल्या सहा महिन्यापासून त्याची फिटींग केली नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल कायम दिसत असून विद्युत पुरवठाही गेल्या चार महिन्यापासून गावात बंद आहे. नाल्याच्या कडेला त्यांचे वास्तव्य!४जादुटोण्याच्या कारणावरुन शासकीय योजनेंतर्गत राहण्यासाठी दिलेले घरकुल सोडून स्थलांतरित झालेले २२ आदिवासी कुटुंबांनी गेल्या आठ महिन्यापासून घोडणकप्पी गावापासून दोन किमी अंतरावर नाल्याच्या कडेला कुठलीही सोय-सुविधा नसतानाही ते आपले जीवन कंठत आहे.परिसरातील काही गावात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून आजही अनेक गावातील आदिवासी बांधवात शैक्षणिक जनजागृती निर्माण झालेली नाही. त्यांचा अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. त्यामुळे जादुटोण्याच्या कारणावरुन नेहमीच वाद घडत असतात आणि अशाच प्रकारामुळे काही कुटुंबांनी गाव सोडल्याचा अंदाज आहे.- पंकज पवार, जिल्हा परिषद सदस्य, चंद्रपूर
जादुटोण्याच्या भयाने घोडणकप्पीचे अख्खे गाव झाले उजाड!
By admin | Published: September 23, 2015 4:49 AM