ब्रह्मपुरी : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध व्यावसायिक सिद्धेश भर्रे यांना त्यांच्या दुकानाच्या समोर असलेल्या रस्त्यावर पाकीट पडलेले दिसले. त्यांनी सदर पाकीट उचलून तपासणी केली असता त्यात ३० हजार रुपये तसेच मोबाइल क्रमांक लिहिलेली एक चिठ्ठी आढळली. त्यांनी सदर पाकीट कोणाचे असेल याचा शोध घेऊन ते संबंधिताला परत केले.
सदर पाकिटामध्ये मिळालेल्या चिठ्ठीवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता तो मोबाइल क्रमांक दुसऱ्या व्यक्तीचा होता. सिद्धेश भर्रे यांनी संपर्क साधलेल्या व्यक्तीला मला जे पाकीट सापडले आहे, त्यात सदर मोबाइल क्रमांक असलेली चिठ्ठी आढळली आहे त्या आधारे मी आपल्याशी संपर्क साधला असून ज्या कुणाचे सदर पाकीट आहे, त्यांनी माझ्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगितले. त्यावरून ज्याचे पाकीट होते, त्याने संपर्क साधला आणि नाव तसेच भेटण्याचा पत्ता विचारून सायंकाळी ७ वाजता आई-वडिलांना घेऊन सिद्धेश भर्रे यांच्या दुकानात गेले. त्या वेळी सिद्धेश भर्रे यांनी मिळालेले पाकीट परत केले. या वेळी आई, वडील आणि सदर मुलाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सदर घटनेवरून अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून आले.