फोटो
विकास खोब्रागडे
पळसगाव (पिपर्डा) (चंद्रपूर) : ताडोबा बफर झोनअंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र पळसगाव येथे गावाला लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या तलावाजवळील झुडपात बुधवारी वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी एकच धुमाकूळ घातल्यामुळे वाघीण आणि तिच्या बछड्यांची ताटातूट झाली आहे. घटनेनंतर पळसगाव येथील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. अशातच गुरुवारी (दि. २४) सायंकाळच्या सुमारास वाघीण गावात शिरल्याची ओरड झाली. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. शुक्रवारी (दि. २५) सकाळी पुन्हा गावाजवळ वाघिणीची डरकाळी नागरिकांनी ऐकली. एका व्यक्तीला वाघिणीने दर्शनही दिले.
शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पळसगाव शिवारात लक्ष्मण किसन गजभे हे आपल्या शेतावर जाताना वाघीण एकटीच जात असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही बाब गावकऱ्यांना सांगितली. वाघिणीची डरकाळी नागरिकांनी ऐकल्याची चर्चा शनिवारी गावात सुरू होती. त्यामुळे पळसगाव, गोंडमोहाडी गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाकडून मात्र वाघीण आणि बछडे जंगलाच्या परिसरात निघून गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.
गावकरी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून परिसराची पाहणी केली. या दरम्यान शेतात वाघिणीच्या पायांचे ठसे दिसून आले. त्यामुळे या शिवारातील शेतकरी व मजूर शुक्रवारीही शेतात गेले नाहीत. त्यांना आपल्या शेतावर जाणेही जिकिरीचे झाले आहे.
बॉक्स
तलाव परिसरात सौरऊर्जेचे कुंपण
वाघिणीच्या गाव तलावालगतच्या भ्रमंती मार्गावर सौरऊर्जेचे कुंपण बसविण्यात येत आहे. पळसगाव व परिसरातील गावात गस्तही वाढविण्यात आली आहे. ज्या ठिकाणी वाघिणीने ग्रामस्थाला जखमी केले, त्या ठिकाणाची झुडपे साफ करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ठेमस्कर यांनी दिली.
कोट
रोज डरकाळी फोडणाऱ्या वाघिणीमुळे गाव दहशतीत आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. जनावरे बांधायला जाताना, पिण्याचे पाणी आणायला जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. एकाही शेतकऱ्याचा किंवा नागरिकाचा बळी गेला तर त्याला दोषी वनविभाग असेल.
- तुळशीदास शेरकुरे
उपसरपंच, ग्रामपंचायत पळसगाव