दीडशे एकर शेती पाण्यात : ढिगाऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह बदललासास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर उपक्षेत्रांतर्गत पोवनी खुल्या कोळसा खाणीकरिता गोवरी शेतशिवारातील नाल्यालगत मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला असून दक्षिण- उत्तर दिशेच्या नाल्याचा प्रवाह दक्षिण- पूर्व झाल्याने परिसरातील दीडशे एकरातील उभ्या पिकांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली असून वेकोलिने याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.सास्ती, पोवनी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणीचे जाळे पसरले आहे. सध्या सात- आठ खाणीमधून कोळसा काढला जातो. तसेच इरावती प्रकल्पांतर्गत पोवनी दोन आणि तीनचे काम सुरु होणार आहे. गोवरी शेतशिवारालगत पोवनी खुल्या खाणीचे काम प्रगतीपथावर आहे. याच शिवारातून दक्षिण ते उत्तर दिशेने वाहणारा जिवंत नाला आहे. या नाल्यातील पाण्यातूनच परिसरातील शेतकरी शेती फूलवीत आहेत. पण मागील काही वर्षापासून हा नाला शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. या नाल्याच्या काठावर वेकोलि प्रशासनाने माती टाकली आहे. सततच्या मातीच्या साठ्यामुळे याच ेरुपांतर ढिगाऱ्यात झाले आहे. या उंच ढिगाऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी चांगलाच वैतागला आहे. आता तर या ढिगाऱ्यांमुळे नाल्यातील पाण्याचा प्रवास बदलला आहे. पूर्वी दक्षिण- उत्तर असा प्रवाह होता. मात्र आता दक्षिण पूर्व दिशेने हा प्रवाह बदलल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात जून महिन्यात शेतकरी सुखावला होता. त्यांनी शेतात सोयाबिन, मिरची, कापूस पिकाची लागवड केली. ही पिके हिरवीगार असतानाच जून महिन्यातच नाल्याच्या ‘बॅक वॉटर’चा फटका पिकांना बसला आहे. पाण्याच्या बदलत्या प्रवाहामुळे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे जवळपास दीडशे एकर शेतातील पिके पाण्याखाली आल्याने जमीनदोस्त झाली आहेत.या संकटाचा सामना करीत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. या दुबार पेरणीनंतर पुन्हा पिके डोलायला लागली होती. मिळालेल्या उत्पन्नातून आर्थिक अडचण दूर होईल, असा विश्वास मनाशी बाळगून स्वप्ने रंगवीत असतानाच पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे. या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा नाल्याचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे संपूर्ण शेतपीक पाण्याखाली आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी कापूस, सोयाबिन नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन- तीन दिवस शिवार जलमय असल्याने पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. (वार्ताहर)
गोवरी शिवारासाठी वेकोलिचे ढिगारे मारक
By admin | Published: September 24, 2015 1:14 AM