ब्रह्मपुरी : वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांच्यावर शासनाकडून होत असलेल्या सततच्या अन्यायामुळे ब्रह्मपुरी उपविभागीय संघटनेच्या वतीने २७ आॅगस्टपासून बेमुदत संप सुरु केले आहे.संघटनेने वारंवार शासन व वनविभागाकडे निवेदन, सभा विनंती, शांतता मार्गाने धरणे आंदोलन, साखळी उपोषण केले. परंतु, शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. अनेक मागण्या २० वर्षापासून प्रलंबित आहेत त्यामुळे संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. शासनस्तरावरुन मागणीला कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. संघटनेने वनरक्षक, वनपाल यांची अन्यायकारक वेतनश्रेणी सुधारणा करणे, वनरक्षक, वनपाल यांना कायम प्रवासभत्ता मंजूर करणे, पोलीस विभागाप्रमाणे सोयीसवलती व भत्ते लागू करणे, एमआरईजीएस विभागाप्रमाणे काम केलेल्या रोजंदारी वन कामगारांना कायम करणे, शासन निर्णय १६ आॅक्टोबर २०१२ अन्वये स्थायी वनकामगारांची सेवा ३० जून २००४ पासून ग्राह्य धरावी, वनमजूरांचा पाच लाखांचाविमा शासनाने काढावा, आदी मागण्यांसाठी बेमुदत बंद वनविभागाच्या कार्यालयासमोर सुरु केले आहे. संपात एन.डी. मडावी, जे. एम. वैद्य, एस.बी. बुरडकर, डी.एस. गेडाम, सिडाम, हटवार, नेरलवार, मोहुर्ले व अन्य वनमजूर सहभागी आहेत. यावेळी ब्रह्मपुरी संघटनेसह नागभीड, चिमूर, तळोधी, सिंदेवाही येथील सर्व वनकर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
वनरक्षक, वनपाल, वनमजुरांचा बेमुदत संप
By admin | Published: August 27, 2014 11:24 PM