सचिन सरपटवार
चंद्रपूर : जैव विविधता व अन्न साखळीतील महत्त्वाचे स्थान असलेला घटक म्हणजे पक्षी. नुकत्याच पार पडलेल्या पक्षी सप्ताहात वारकरी पक्ष्यांसह १०७ प्रवासी व स्थलांतरित प्रजातीच्या पक्ष्यांची वारी भद्रावतीत इको प्रो संघटनेच्या सदस्यांना रविवारी अनुभवायला मिळाली. रंगीबेरंगी, वेगवेगळी शरीर रचना असलेली, विविध आकाराच्या पक्ष्यांच्या चोची, अशा निसर्गाला तारणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे विश्व पाहायला मिळाले.
इको प्रो संघटना भद्रावतीतर्फे नुकताच पक्षी सप्ताह पाळण्यात आला. भद्रावती परिसरातील विंजासन, मल्हारा, गवराळा, डोलारा, गोरजा तलाव व इरई डॅम परिसरात बायना कुलर दुर्बिणीद्वारे पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. तलावांच्या काठांवर व तलावामध्ये सुकलेल्या झाडावर विशेष करून पक्षी आढळून आले. यामध्ये या परिसरात पहिल्यांदाच आढळून आलेला जांभळा बगळा तसेच सर्वांचे लक्ष आपल्या बदलत्या रंगाने केंद्रित करणारी जांभळी पाणकोंबडी, तिरंदाज पक्षी, छोटा बगळा, रंगीत करकोचा, सामान्य तुतारी पक्षी, ठिपकेवाला तुतारी, शेकोट्या चातक, पांढरा धोबी, पिवळ्या डोक्याचा धोबी, काळा थीरथिरा, उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा व इतर रंगीबिरंगी पक्षी दुर्बीणमध्ये टिपल्या गेले.
सकाळी सहा ते साडेआठपर्यंत पक्षी निरीक्षण केल्यानंतर परिसरातील स्थानिकांना पक्ष्यांबद्दल व त्यांच्या अधिवासाबद्दल संघटनेच्या सदस्यांनी माहिती दिली व जनजागृती केली. यासोबतच आज याच पक्ष्यांचे वृक्षतोडीमुळे अधिवास धोक्यात आले आहे. टॉवर व इलेक्ट्रिक पोलवर ही पक्षी घरटी बांधताना दिसून येत आहेत. तलाव व धरणात घेतल्या जाणारा गाळपेरा या अधिवासाला मारक ठरत आहे. तलावाचे खोलीकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याने अधिवासासोबत पक्ष्यांचे तलावातील खाद्यही कमी होत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावर नियंत्रण आणणे जरुरी असल्याचेही ते म्हणाले.
अनेक ठिकाणी वडाच्या झाडांची तोड झाल्याने त्यावर येणारा राज्यपक्षी हरियाल हा दिसेनासा झाल्याची खंत पक्षीप्रेमींनी व्यक्त केली. पक्षी सप्ताहाच्या या उपक्रमात इको प्रो संघटनेचे भद्रावतीचे संदीप जीवने, प्रगती जीवने, अमोल दौलतकर, संतोष रामटेके, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, संजय रॉय, दीपक कावठे, राहुल सपकाळे, संदीप वालदे, शंकर थेरे व शिरीष उगे हे सदस्य सहभागी होते.
अधिवासासाठी तलाव राखीव करा
शहरालगत असलेल्या काही तलावांचे ले-आउटमध्ये रूपांतर झाले. ते तलाव न. प.कडून राखीव करण्यात यावे. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास वाचेल, असे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबतचे निवेदन पक्षीमित्र व इको प्रो संघटनेने खासदार बाळू धानोरकर यांना दिले आहे.