चंद्रपूर : वरोरा तालुक्यात अलीकडे गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. स्थानिक पोलिसांचा अंकुशच नसल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे. शहरात पोलीस आहे की नाही अशी अवस्था होती. वरोरा येथे नव्याने रूजू झालेले उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी हे आयपीएस आहेत. आल्या आल्या त्यांनी त्यांच्या अधिनस्त स्टाॅफला समज दिली. वरोरा शहरातील अवैध धंदेवाइकांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याची माहिती आहे. काही जणांनी आपला ठिय्याच वणीला हलविल्याची माहिती आहे. ही बाब वरोरा येथील जनतेसाठी सुखावणारी असल्याचे बोलले जात आहे.
वरोरा हे चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. चांगल्या -वाईट गोष्टींचा शिरकाव या तालुक्यातूनच होतो. हे शहर सट्टा, अवैध दारू, क्रिक्रेटवर सट्टा, जुगार, अवैध धंद्याचे माहेरघर झालेले आहे. या मंडळींशी पोलिसांशी अतिशय जवळीक असल्याने ते शहरात उजळ माथ्याने वावरताना दिसून येत होते. शहरात चोरीची मालिका सुरूच आहे. मात्र एकही आरोपी अटक झाला नाही. हत्येच्या घटना घडल्या आहेत. जनावरांची तस्करीचाही हाच मार्ग आहे. यामध्ये एका पोलीस शिपायाचा नाहक बळीही गेला. मात्र येथील पोलीस प्रशासनाला त्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. शहरात कायदा व सुव्यवस्था आहे वा नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. अशातच चित्रपटातील सिंघमप्रमाणे आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी हे येथील नवे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रूज होताच शहरातील सारे अवैध धंदेवाले भूमिगत झाले आहेत. इतकेच नव्हे तर येताक्षणी आपल्या अधिनस्थ स्टाफला माझ्या नावावर वसुली कराल तर खबरदार असा दम दिल्याने त्यांचीही घाबरगुंडी उडाली आहे.
कुणी रेड देता का रेड?
नव्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्थ स्टाॅफचा क्लास घेऊन त्यांना यापुढे प्रत्येकाकडून रेड अपेक्षित असल्याचा दम दिला. यानंतर वरोरात नाममात्र कारवाया करणाऱ्या पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. हे पोलीस कुणी रेड देता का रेड म्हणून इकडे-तिकडे फोन करीत आहेत.
नवे एसडीपीओ ‘त्या’ फाईल उघडतील काय?
मागील तीन ते चार वर्षांत वरोरा शहरात अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. याचा तपास स्थानिक पोलिसांनी नाममात्र केल्याचे शहरातील जाणकार नागरिकांमध्ये बोलले जात आहे. या गुन्ह्याच्या फाईल्सवर एक दृष्टी फिरविल्यास सारा खेळ लक्षात येईल, ही अपेक्षा वरोरातील जनतेला नव्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून असल्याची चर्चा आहे.