वरोरा : शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
वरोरा तालुक्यात कोविडग्रस्तांची वाढती संख्या आणि त्यांच्याकरिता कमी प्रमाणात उपलब्ध प्राणवायूच्या खाटा बघता रुग्णांचे प्राण वाचविणे हे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर असताना प्रशासनाच्या वतीने वरोरा शहरातील संस्था आणि दात्यांना प्राणवायूचे मशीन देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
वरोरा शहरात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. अनेकांनी चंद्रपूर, नागपूरसह आंध्र प्रदेशात खाटा मिळविण्याकरिता धडपड केली. मात्र त्या उपलब्ध नसल्यामुळे वरोरा शहरात त्यांची व्यवस्था करणे अवघड झाले आहे. यात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याने वरोऱ्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी शहरातील सामाजिक संस्था आणि दात्यांना कॉन्सन्ट्रेटर मशीन तसेच प्राणवायूचे सिलिंडर भेट म्हणून देण्याची विनंती केली होती. याला शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला. यात आनंदवनाच्या वतीने आठ कॉन्सन्ट्रेटर मशीन आणि तीन जम्बो प्राणवायूचे सिलिंडर, संजोग चिटफंडच्या संचालकांकडून कॉन्सन्ट्रेटर मशीन, किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शंभुनाथ वरघणे, श्री गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष रमेश राजूरकर, संदेश चोरडिया, प्रमोद मगरे, बाळू चिंचोळकर, लोकमान्य विद्यालयाच्या १९९३च्या बँकचे अतुल गुंडावार व त्यांचे सहकारी, पुरुषोत्तम वांदिले, विनोद मणियार आणि सरकार ग्रुपचे अध्यक्ष आसिफ खान यांनी प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर मशीन्स भेट दिल्या. याशिवाय जीएमआर कंपनी, वर्धा पावर कंपनी आणि वेस्टर्न कोलफिल्ड कुचनाच्या वतीने ३० प्राणवायूच्या खाटा उपलब्ध झाल्या आहेत. नुकतेच हे सर्व साहित्य उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी प्रतिभा धानोरकर यांच्यासह तहसीलदार प्रशांत बेडसे, सुभाष दांदडे उपस्थित होते.
वरोरा शहराप्रमाणेच तालुक्यातसुद्धा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत.