वरिष्ठांनी लक्ष द्यावे : घोटभर पाण्यासाठी सात किलोमीटरची पायपीटगोंडपिपरी : क्षुल्लक तांत्रिक बिघाडामुळे मागील चार दिवसांपासून धाबा-गोजोली प्रादेशिक योजनेचा पाणीपुरवठा ठप्प आहे. यामुळे १३ गावांत पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. नागरिकांना गावाजवळील नाल्यातील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.धाबा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून १३ गावांना पाणीपुरवठा केला जातो. हजारो नागरिकांची तहान या योजनेतून भागते. योजनेत समाविष्ट असलेल्या अनेक गावांत पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचा अभाव आहे. धाबा प्रादेशिक योजना सध्या कंत्राटदाराच्या हातात आहे. तेच या योजनेची देखभाल करतात. या योजनेला वर्धा नदीच्या पात्रात असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. येथे असलेल्या विद्युत संचात बिघाड झाल्याने पाणीपुरवठा ठप्प असल्याचे कंत्राटदाराकडून सांगण्यात येत आहे. मात्र, यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.या योजनेत समाविष्ट असलेल्या धाबा गावात ग्रामपंचायतीच्या काही विहिरी आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचा उपसा न केल्याने तेथील पाणी पिण्यास योग्य नाही. त्यामुळे व्यक्तिगत मालकी असलेल्या विहिरींवर तोबा गर्दी दिसून येत आहे. त्याही विहिरींनी तळ गाठला असल्याने उपसा न करण्यात आलेल्या विहिरीतील गढूळ पाण्याने नागरिक तहान भागवत आहेत.या योजनेत येणाऱ्या कोडोंना बेघरवस्ती येथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गावापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या नाल्यात विहिरी खोदून तहान भागवित आहेत. मागील वर्षीही या योजनेचे कंत्राट बोरकर नामक व्यक्तीला देण्यात आले होते. त्यावेळी क्षुल्लक कारणाने हीच परिस्थिती उद्भवलेली होती. याही वर्षी हीच परिस्थिती उद्भवली आहे. योजनेच्या देखभालीत कंत्राटदाराच्या बेजबाबदारीपणामुळे १३ गावांतील हजारो नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, योजनेत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतींचे काही सरपंच ग्रामीण पाणीपुरवठा योजना चंद्रपूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत असल्याचे समजते. (तालुका प्रतिनिधी)
तांत्रिक बिघाडाने १३ गावांवर जलसंकट
By admin | Published: May 30, 2016 1:15 AM