लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची पातळीही खोल गेली असून, चंद्रपूर शहरातील काही वार्डामध्ये पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विविध प्रभागांमध्ये महापालिकेच्या ८ आणि खासगी ४, अशा १२ टँकरद्वारे दिवस-रात्र १८० फेऱ्या केल्या जात आहे. मात्र, नागरिकांची पाण्याची मागणी वाढल्याने काही ठिकाणी नागरिकांना भटकावे लागत आहे. एप्रिल महिन्यामध्येच ही स्थिती असल्याने पुढील मे महिन्यात जलसंकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहराला इरई धरण व इरई नदी या दोन ठिकाणांहून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी मार्च महिन्यात उन्हाळ्याला सुरुवात होताच पाणीटंचाई निर्माण झाली. नळाला पाणी येत नसल्याने अनेक प्रभागातील लोक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. शहरातील विविध प्रभागांत मार्च महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आता परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून दररोज टँकरद्वारे १८० फेऱ्या मारल्या जात आहे. मात्र पाणी अपुरे पडत असल्याने टँकरची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला, तरी ही स्थिती दरवर्षीसारखीच आहे. दरवर्षी ज्या भागात पाणीटंचाई असते. अशीच स्थिती यावर्षीही आहे. शहरात भीषण टंचाई नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या परिसरात पाणीटंचाईवडगाव, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन परिसर, जगन्नाथ बाबा वार्ड, रमाईनगर, अष्टभूजा वार्ड, बाबूपेठ, नगिनाबाग, घुटकाळा, गुलमोहर, महाकाली कॉलरी, अंचलेश्वर गेट, राष्ट्रवादी नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट, कृष्ण नगर, इंदिरा नगर यासह अन्य भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
९० ठिकाणी बसवल्या तात्पुरत्या टाक्याशहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध भागामध्ये २० ठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या टाकी बसविल्या आहे. या टाकीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्यानंतर नागरिक आपापल्या घरी पाणी नेत आहे.