जलयुक्त शिवार योजना : कार्यकारी अभियंत्याने देयक रोखलेचंद्रपूर : राज्यात राबविण्यात आलेल्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतही अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाची कामे करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील मूल तालुक्यात ताडाळा येथे बांधण्यात आलेल्या नाला बंधाऱ्यातून पाणी वाहून गेले आहे. याबाबत तक्रार झाल्यानंतर लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या कामाचे देयक रोखले आहे.मूल तालुक्यातील ताडाळा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गेल्यावर्षी जलयुक्त शिवार योजनेचे काम करण्यात आले. त्याअंतर्गत ताडाळा ग्रामपंचायतने नाला बंधाराचे काम केले. शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाचे पाणी मिळावे म्हणून नाल्यावर बांध घालण्यात आला. या कामाची अंदाजपत्रकीय किंमत सात लाख रुपये आहे. नाल्यावर बंधारा घालण्याचे काम बापुजी बामणे यांच्या शेताजवळ करण्यात आले. आॅगस्ट महिन्यात आलेल्या पावसाने बंधाऱ्यातील पाणी बांधकाम फुटून वाहून गेले. यासंदर्भात अण्णा हजार विचार मंचचे सचिव बापूराव जराते यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी करण्याची मागणी जराते यांनी केली. लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एच.एस. सहारे यांनी तालुकास्तरावर चौकशीचे आदेश दिले. या चौकशीमध्ये ग्रामपंचायतने जलयुक्त शिवार योजनेतून नाला बंधाऱ्याचे काम केले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकारी अभियंता सहारे यांनी नाला बंधाऱ्याचे देयक रोखून धरले आहे. (प्रतिनिधी)मूल तालुक्यातील ताडाळा येथे जलयुक्त शिवार योजनेतून नाला बंधारा बांधण्याचे काम देण्यात आले होते. कामाच्या दर्जाबाबत तक्रार प्राप्त झाली होती. ग्रामपंचायतकडे विचारणा करण्यात आल्यावर बंधाऱ्याचे काम केले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे देयक थांबविण्यात आले आहे.- एच.एस. सहारे, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन विभाग, चंद्रपूर
बंधाऱ्यातून पाणी गेले वाहून
By admin | Published: October 19, 2016 1:00 AM