चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात बांधकामाधीन असलेल्या हुमन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात चिमूर तालुक्यातील ३३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे चिमूर तालुक्यातील दहा गावे पूर्णतः बाधित होणार असून, आठ गावे अंशतः तर पंधरा गावातील जमीन बाधित होणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील पुनर्वसन आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्यामुळे कार्यकारी अभियंता चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक एक यांनी १ डिसेंबरच्या पत्राचा संदर्भ देत चिमूर पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना कर वसुली नोंदवहीची मागणी १७ डिसेंबर रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींच्या सचिवांना करण्यात आली आहे. या प्रकल्पात जी गावे पूर्णतः बाधित होणार आहे. त्या गावांचे पुनर्वसनही होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील आराखडा शासनस्तरावर तयार होणार असून, गावातील लोकसंख्या, घरे, कुटुंबसंख्या याबाबत परिपूर्ण माहिती शासनाकडून ग्रामपंचायतींना मागण्यात आली आहे. हुमन प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र चिमूर तालुक्यातील असून यामुळे चिमूर तालुक्यासह सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार आहेत. त्यामुळे चिमूर तालुक्यात काही दिवसात जलक्रांती होणार आहे त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.
बॉक्स
चिमूर तालुक्यातील पूर्णत: बाधित गावे
खातोडा, वडसी, महादवाडी, सोनेगाव गावंडे, वाघेडा, मानेमोहाडी, विहीरगाव, गोंडमोहाळी, भडक पळसगाव, पिपर्डी ही गावे पूर्णतः बाधित होणार असून, आठ गावे अंशतः तर पंधरा गावांमधील जमीन बाधित होणार आहे.