वेदान्त मेहरकुळे - गोंडपिंपरीउन्हाळा ऋतूत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. मात्र अधिकार्यांच्या दुर्लक्षितपणा व शासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. यंदाही तीच स्थिती तालुक्यात दिसून येते. ९८ गावांचा विस्तारित तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या गोंडपिंपरी तालुक्यात एकूण पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. यात धाबा, लाठी, विठ्ठलवाडा, वढोली व चेकनांदगाव यांचा समावेश आहे. पूर्वी सदर योजनांची जबाबदारी ही शिखर समितीकडे असताना नागरिकांना पाण्यासाठी विशेष भटकावे लागत नव्हते. मात्र मागील दोन वर्षांपासून या योजनांची देखभालदुरुस्ती विशिष्ट अशा एजन्सी कंत्राटदारांना देण्यात आल्याने मलिंदा लाटणार्या कंत्राटदारांकडून शासन निधी हडपल्या जात आहे. या प्रकारामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम, साथ रोगाची लागण व पाण्यासाठी दैनदिन भटकंती असे विदारक चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करणार्या एजन्सींकडून कमी मजुरांचा वापर, पाणी टाकी स्वच्छतेकडे दुर्लक्ष, पाणी नमुने तपासणीदेखील महिन्यातून केवळ एकदाच, परिसरात घाणीचे साम्राज्य तर अल्प मजूर कामावर असल्याने दोन ते तीन दिवसाआड पाण्याचा पुरवठा व पुरविण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळे साथ रोगांचे वाढलेले प्रमाण या सर्व बाबी दिसून येत आहे. या बाबींमुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी या एजन्सींची देयके काढताना होणार्या साटेलोटे व्यवहारातच अडकून पडले आहे. यामुळे शासनाच्या पाणी पुरवठा करणार्या योजनाही कुचकामी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अतवृष्टीत या एजन्सींचा पाणी पुरवठा बंद असतो. तरीही २ ते ३ महिन्यांची देयके सादर करून शासन निधी हडपल्याचा प्रकारही घडल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.ग्रामीण पाणीपुरवठा व जलस्वराज्य अंतर्गत गोंडपिंपरी तालुक्यातील गणेशपिपरी, नंदवर्धन, राळापेठ, धानोरा, सालेझरी या गावांमध्ये काही ठिकाणी टाकी बांधकाम पूर्ण तर काही गावांमध्ये निधी उचल होऊनही बांधकाम अपूर्ण, विद्युत जोडणीचा निधी नसल्याने वर्ष २00७-0८ आर्थिक वर्षात मंजुरी मिळूनही आजपर्यंत नळयोजना कार्यान्वित नसल्याची माहिती मिळाली.तालुक्यातील मौजा राळापेठ येथे गेल्या एक ते दीड महिन्यांपासून डेंग्यू व अज्ञात रोगाच्या साथीमुळे पाच जण दगावले असून तेथील पाणी पुरवठा योजना अद्यापही कार्यान्वित नाही. राळापेठ येथील जीवहानीमागे दूषित पाणीच कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागरिकांना लगतच्या वैनगंगा नदीपात्रातून पाणी आणावे लागते. मात्र आष्टी पेपर मिलमधून नदीपात्रात अस्वच्छ पाणी व रसायन सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणीही दूषित झाले आहे.
गोंडपिंपरी तालुक्यातही पाणी टंचाईचे संकट
By admin | Published: June 04, 2014 11:37 PM