लोकमत न्यूज नेटवर्क संघरक्षित तावाडे चंद्रपूर: जिल्ह्यातल्या घनपठार या ६० घरांच्या गावातील निम्मी कुटुंबे उन्हाळ्याच्या तोंडावरच भेडसावणाऱ्या पाणीटंचाईपायी गाव सोडून निघून गेली आहेत. सध्याची गावातील पाण्याची स्थिती पाहता काही दिवसात उरलेली कुटुंबेही दुसऱ्या गावांच्या आश्रयाला जातील अशी शक्यता तेथे वर्तविली जात आहे.या गावातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. येथे असलेल्या नळांना पाणी नाही. गावातील टाकीत पाणी नाही. जे थोडेफार पाणी आहे ते अतिशय गढूळ व आरोग्यदृष्ट्या अनिष्ट असे आहे. त्यामुळे नागरिकांना ररोज दीड कि.मी. ची पायपीट करून रोजचे पाणी भरावे लागत आहे. त्यात डोक्यावर तापणारे उन त्रस्त करत आहे. अशा कारणांमुळे या गावातील जवळपास निम्मी कुटुंबे दुसऱ्या गावांच्या आश्रयाला किंवा जिथे पाणी आहे अशा शेतात रहायला गेली आहेत. या गावात पाण्याची मोठी टाकी होती. मात्र त्या टाकीला मोठे भगदाड पडल्याने व त्याची दुरुस्ती न झाल्याने गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावकरी पहाटे चार वाजता उठून दीड कि.मी. खडतर वाट चालून जातात. तेथे नाल्यात असलेले गढूळ पाणी एका लहानशा भांड्याने भरून घेतात. हेच पाणी आम्ही जनावरांनाही देतो व आम्हीही वापरतो असे त्यांचे सांगणे आहे.येथील प्रशासन व लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देत नाहीत अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. या गावात टँकर सुरू करावा अशी त्यांची मागणी आहे.
पाणीटंचाई: चंद्रपूर जिल्ह्यातल्या घनपठार गावातील निम्मे गावकरी गाव सोडून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 3:46 PM
जिल्ह्यातल्या घनपठार या ६० घरांच्या गावातील निम्मी कुटुंबे उन्हाळ्याच्या तोंडावरच भेडसावणाऱ्या पाणीटंचाईपायी गाव सोडून निघून गेली आहेत.
ठळक मुद्देदीड कि.मी. पायी जाऊन आणावे लागते रोजचे पाणीगढूळ पाणी पिऊन जगत आहेत गावकरीप्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष