चिमूर : येथील प्रभाग क्रमांक दोनअंतर्गत येणाऱ्या काडकूडनगर येथील महिला पाण्यासाठी भटकंती करत आहेत. मात्र, चिमूर नगरपरिषद प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.
पाणीसमस्या सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा करूनही समस्यांवर लक्ष घातले जात नाही. त्यामुळे वॉर्डातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
त्यातल्या त्यात नळाचा पाणीपुरवठा एकदिवस आड केला जातो. त्यामध्ये पिण्यायोग्य पाणी पुरेसे मिळत नाही. नळाला पाणी आले, तरीही पाण्यामध्ये ब्लिचिंग नाही, टाकीची अस्वच्छता असते. या सुविधा न देताही नगरपरिषदेकडून मात्र कर पूर्णपणे आकारला जातो. मग पाणीपुरवठा का योग्य का होत नाही, असा प्रश्न येथील नागरिक नगरपरिषद प्रशासनाला करीत आहेत. एकीकडे जनता महामारीच्या संकटात सापडली आहे आणि दुसरीकडे पिण्याच्या व घरगुती वापराच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या समस्येवर नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन चिमूर काडकूड नगरातील पाणीपुरवठा रोज करावा, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल.
कोट
चिमूर शहरात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असून, काडकूडनगर येथील जनता पाण्याअभावी त्रस्त आहे. आधीच दोन दिवस आड पाणीपुरवठा होतो. तेही नळाला धार बरोबर राहत नसल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे.
- सूरज नरुले
शहर भाजपा महामंत्री, चिमूर.