चंद्रपूर: स्थानिक बंगाली कॅम्प ते बाबुपेठ दरम्यान, चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान जेसीबीने खोदकाम करताना पाईल लाईन फुटल्याने गेल्या दोन दिवसांपासून बाबुपेठ परिसरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत चंद्रपूर महानगर पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. चंद्रपूर शहरात पाणी पुरवठा करणारी अंतर्गत पाईललाईन आहे. मात्र विविध कामांसाठी रस्ते फोडून काम केले जात आहे. त्यामुळे पाईप लाईन फुटून पाणी पुरवठा ठप्प होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. सध्या बंगाली कॅम्प ते बाबुपेठ पर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मार्गावर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली पाईप लाईन त्याच भागात अन्यत्र हलविण्यात आली. मात्र जी पाईप लाईन आडवी गेली आहे. तिचे पुनर्वसन मात्र करण्यात आले नाही. असे असतानाही कंत्राटदाराने चौपदरीकरणाचे काम सुरूच ठेवले. यासाठी जेसीबीने रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असतानाच जयश्रीया लॉन समोरून गेलेली पाईप लाईन फुटली. यामुळे अष्टभूजा वॉर्ड, बाबुपेठकडे होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत माहिती मिळताच, मनपाने बांधकाम विभाग आणि चौपदरी रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. यापूर्वी रिलाईन्स कंपनीतर्फे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू असताना वाहतूक नियंत्रण शाखेजवळ जलवाहीनी फुटली होती. त्यामुळे दोन दिवस त्या भागातील पाणी पुरवठा ठप्प होता. (प्रतिनिधी)
पाईप लाईन फुटल्याने बाबुपेठमधील पाणी पुरवठा ठप्प
By admin | Published: June 21, 2014 11:55 PM