लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत बल्लारपूर शहराच्या ६५.९३ कोटी रू. किमतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १ नोव्हेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.बल्लारपूर या जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहरात विकासाचे विविध प्रकल्प मंजूर करत शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून बल्लारपूर शहराच्या पाणी पुरवठयाच्या प्रश्नावर या माध्यमातून प्रभावी उपाययोजना होणार आहे. बल्लारपूर नगर परिषदेच्या सदर पाणी पुरवठा प्रकल्पाच्या योजनेची मंजूर किंमत ६५.९३ कोटी असून राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान ५९.३३७ कोटी इतके आहे तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग ६.५९३ कोटी इतका आहे. सदर प्रकल्पाचे कार्यान्वयन बल्लारपूर नगर परिषदेमार्फत करण्यात येणार असून सदर प्रकल्पास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त करणे बंधनकारक राहणार आहे. कायार्देशाच्या दिनांकापासून १८ महिन्यांच्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.बल्लारपूर शहरात ११ कोटी रू. किमतीचे बसस्थानकाचे अत्याधुनिकीकरण, शहरात स्मार्ट पोलीस स्टेशनचे बांधकाम, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम, नाटयगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, शहरानजिक २७ कोटी रू.किमतीचे स्टेडियमचे बांधकाम, केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून २६५ कोटी रू. किमतीची सैनिकी शाळा, सात कोटी रू. किमतीची मुलींची डीजीटल शाळा अशी विविध विकासकामे मंजूर करत शहरात विकासाचा झंझावात निर्माण करणाऱ्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर येथील रेल्वे स्थानक देशातील सर्वाधिक सुंदर रेल्वेस्थानक म्हणून पुरस्कारप्राप्त ठरले आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत बल्लारपूर शहराच्या ६५.९३ कोटी रू. किमतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पास मिळालेली मंजुरी ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित आहे.
बल्लारपूरच्या पाणी पुरवठा प्रकल्पाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 10:55 PM
अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत बल्लारपूर शहराच्या ६५.९३ कोटी रू. किमतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १ नोव्हेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार : ६५.९३ कोटींची तरतूद