बजावली नोटीस : वाहन भत्त्यावरूनही आमसभेत गदारोळचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्थाच सध्या कोलमडली आहे. बहुतांश वॉर्डात पाण्यासाठी बोंबा सुरू आहे. अर्धा तासही नळाला पाणी येत नाही. मनपा प्रशासनही याबाबत गंभीर पाऊल उचलत नाही. त्यामुळे गुरुवारी पार पडलेल्या मनपाच्या आमसभेत ३०-४० नगरसेवकांनी पाणी पुरवठ्यावर आपला संताप व्यक्त करीत आयुक्तांना जाब विचारला. यावर पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीला ‘कंत्राट का रद्द करू नये’ या आशयाची नोटीस बजावल्याची माहिती आयुक्तांनी सभागृहात दिली.महानगरपालिकेची आमसभा आज गुरुवारी दुपारी १ वाजता महापालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. चंद्रपूर शहराचा कारभार सुरळीत चालविण्याकरिता झोननिहाय विभाजन केले आहे. तीन झोनमध्ये अंजली घोटेकर, सचिन भोयर व अजय खंडेलवाल हे झोन सभापती म्हणून कार्यरत आहे. त्यांनी अधिकाऱ्यांप्रमाणे सभापतींनाही वाहन भत्ता मिळावा, अशी मागणी केली. याबाबतचा प्रस्ताव आजच्या आमसभेत ठेवण्यात आला. मात्र ठरल्याप्रमाणे हा विषय सभागृहात येताच नगरसेवक नंदू नागरकर, संदीप आवारी यांच्यासह बहुतांश नगरसेवकांनी यावर आक्षेप घेत एकच गदारोळ केला. महानगरपालिका अधिनियमात झोन सभापतींना वाहन भत्ता देण्याची कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे असा कोणताही भत्ता सभापतींना देण्यात येऊ नये, अशी भूमिका बहुतेक नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे याबाबत कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. यावर संबंधित झोन सभापतींनी अधिकाऱ्यांनाही वाहन भत्ता देऊ नये, अशी मागणी केली. चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा सध्या मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. नागरिकांना प्यायलाही पाणी मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे यावर बहुतांश नगसेवकांनी आपला रोष व्यक्त केला. मनपा प्रशासन याबाबत गप्प का असा सवालही नगरसेवक संजय वैद्य यांनी उपस्थित केला. यावर सर्व नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत पाणी पुरवठ्याचे गाऱ्हाणे मांडले. याला उत्तर देताना आयुक्त सुधीर शंभरकर यांनी कंत्राटदाराला ‘आपले कंत्राट रद्द का करण्यात येऊ नये’ या आशयाची नोटीस बजावून सात दिवसात उत्तर मागविल्याची माहिती सभागृहात दिली.मनपा हद्दीतील किती इमारतींचे व हॉटेल्सचे फायर आॅडीट करण्यात आले, असा प्रश्न नगरसेविका सुनिता लोढिया यांनी सभागृहात उपस्थित केला. केवळ ३५ इमारतींचे असे आॅडीट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. त्यावर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. मनपा हद्दीबाबतचा पर्यावरण अहवाल बोगस तयार करण्यात आल्याचा आरोप यावेळी नगरसेवक संजय वैद्य यांनी केला. वेकोलिच्या ढिगाऱ्यांमुळे शहरातील नदी-नाल्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. तरीही पर्यावरण अहवालात याबाबत काहीही नाही, ही बाबही त्यांनी निदर्शनात आणून दिली. येथील जुन्या डाक कार्यालयासमोरील चौकाला श्री कन्यका माता वासवी चौक असे नाव देण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच मुला-मुलींच्या गुणोत्तर प्रमाणाच्या विषयालाही मंजुरी देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
पाणी पुरवठ्यावरून उज्ज्वल कन्स्ट्रक्शन मनपाच्या रडारवर
By admin | Published: September 25, 2015 1:26 AM