राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अल्प पावसामुळे धान उत्पादनात प्रचंड घट झाल्याचा फ टका यंदा राईस मील उद्योगालाही बसला असून शेतकऱ्यांकडून धानाची आवक घटल्याने जिल्ह्यातील ६० राईस मील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. व्यवसायच चालला नाही तर बँकांकडून घेतलेले कर्ज कुठून भरायचे, या चिंतेने मोठ्या मील मालकांनी आंध्र, तेलंगणा, अन्य राज्यांतून धान आयातीची तयारी सुरू केली आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ५१ हजार ५५५ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली. प्रामुख्याने चंद्रपूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली व गोंडपिपरी तालुक्यात भातशेती लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सिंचनाचा अभाव असतानाही शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या प्रजातींची लागवड केली. पारंपरिक पद्धत नाकारून आधुनिक तंत्राचा आधार घेतला. धान उत्पादनाचे क्षेत्र लक्षात घेवून राईस मील उद्योगाचा जिल्ह्यात मोठा विस्तार झाला आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माहितीनुसार सद्य:स्थितीत १८४ राईस मीलची नोंद आहे़ पण, प्रत्यक्षात ७० मील आचके देत सुरू असल्याची माहिती पुढे आली़.
एकरी केवळ आठ पोते उत्पादनधान उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात एकरी सुमारे २० ते २५ पोते धान्याचे उत्पादन होते़ विविध किडींचे आक्रमण आणि पुरेशा पावसाअभावी यंदा एकरी केवळ आठ पोते धान्य शेतकऱ्यांच्या हाती आले़ यातील वर्षभर खायचे आणि विकायचे किती, या प्रश्नाने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे.
धान उत्पादक शेतकरी हे आमचे शाश्वत पुरवठादार आहेत़ त्यांच्याच आधारावर राईस मिल व्यवसाय चालतो़ प्रदूषण नियंत्रण मंडळापासून तर शासनाच्या विविध प्राधिकरणाच्या जाचक नियमावलींचे पालन करताना भांडवली खर्च वाढला़ मात्र, धानाची आवकच नसल्याने हा व्यवसाय यंदा डबघाईस येण्याची चिन्हे दिसत आहेत़- जीवन कोंतमवार, राईस मील व्यावसायिक, मूल