सर्वांचे इंग्रजीकडे लक्ष : शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधातदेवाडा (खुर्द) : काही दिवसापूर्वी खेड्यापाड्यात केवळ मराठी माध्यम असलेल्या शाळा होत्या. आता मात्र गावागावांत कॉन्व्हेंट संस्कृती आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा कल इंग्रजीकडे वळत असल्याने मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात गावागावांत फिरत आहे.जिल्हा परिषद आणि खासगी संस्थांनी पाचवी ते दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमांच्या शाळा गावोगावी सुरू केल्या. या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी व पालकांना बरीच कसरत करावी लागत होती. परंतु आता हे चित्र मात्र उलट झाले आहे. प्रत्येक मराठी माध्यम असलेल्या शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दारोदारी फिरत आहेत. प्रतिस्पर्धी मराठी शाळेपेक्षा आपली शाळा कशी चांगली आहे, हे पालकांना पटवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. तरीही त्यांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांचा इंग्रजीकडे वाढलेला कल त्यासाठी कारणीभूत ठरत आहे.उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना सुद्धा शासनमान्य खासगी शाळेचे शिक्षक गावागावात विद्यार्थी मिळविण्याकरिता भटकत आहेत. त्यांना आपल्या शाळेतील संबंधित वर्ग तुकडी वाचविणे, विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. इंग्रजी माध्यमाने त्यांच्यापुढे हे मोठे आव्हान उभे केले आहे. प्रत्येक पाल्य मात्र आपल्या पाल्याचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घ्यावे यासाठीच आग्रही दिसून येत आहे. काही इंग्रजी शाळा विद्यार्थी व पालकांना विविध प्रलोभनेही दाखवित आहे. मराठी माध्यमांच्या शाळांकडे सध्या विद्यार्थी व पालकांनी पाठ फिरविली आहे. परिणामी मराठी माध्यमांच्या शाळांचे अस्तीत्त्व टिकविण्यासाठी संस्था चालक व शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागत आहे. शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्याकरिता विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागत आहे.इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत असल्याने मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक काळात इंग्रजीचे शिक्षण अत्यंत गरजेचे असले तरी, मातृभाषेतील शिक्षणाला जपणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी इंग्रजीसोबत मराठीलाही महत्त्व देणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)
मराठी शाळा बंदच्या मार्गावर
By admin | Published: June 15, 2014 11:27 PM