विसापूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे गावागावातील पथदिवे देयक पूर्वी जिल्हा परिषद भरत होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन निश्चिंत होते. आता मात्र वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीवर बडगा उगारला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात पथदिवे बंद होण्याच्या मार्गांवर आहे.
परिणामी ग्रामपंचायत प्रशासन वीज देयकसंदर्भात अडचणीत आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीवर तब्बल २ लाख ८६ हजार २०० रुपये पथदिवे देयक थकीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे गावात पथदिव्याअभावी अंधाराचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. विसापूर ग्रामपंचायत यावर काय मार्ग काढते, याकडे गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गावात ५८० वीज खांब असून त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे. गावागावातील पथदिव्याचे देयक यापूर्वी जिल्हा परिषद १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वतः भरणा करीत होती. मात्र आता वीज वितरण कंपनी वीज देयक ग्रामपंचायत कडून वसूल करण्याचा फतवा काढला आहे. यामुळे ग्रामपंचायत चांगलीच अडचणीत आली आहे. विसापूर ग्रामपंचायत हद्दीत पथदिवे लागणारे १० मीटर लागले आहेत. एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ दरम्यान पथदिवे देयकाचा भरणा करा, म्हणून वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतला अल्टिमेटम दिला आहे. थकीत एवढी रक्कम कशी भरावी, या विवंचनेत ग्रामपंचायत आली आहे.
ग्रामपंचायतीने वीज देयकाचा भरणा पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदने द्यावा म्हणून राज्य विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना भेटून कैफियत मांडली. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पथदिव्याची वीज कपात करू नका म्हणून सांगितले. मात्र वीज वितरण कंपनी ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. यामुळे ग्रामपंचायत अडचणीत आली आहे.
बॉक्स
ग्रा.पं. पदाधिकारी धास्तावले
ऐन सणासुदीच्या दिवसात पथ दिवे बंद होणार म्हणून ग्रामपंचायत पदाधिकारीदेखील धास्तावले आहे. गावकऱ्यांना अंधारात कसे ठेवावे, याची चिंता सतावत आहे. जिल्हा परिषद पूर्वी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथ दिवे देयकाची रक्कम कपात करत होती. त्याच धर्तीवर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिवे देयकाचा भरणा करण्याची तरतूद करण्यास संमती द्यावी, अशी मागणी बल्लारपूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने केली आहे.
कोट
कोरोना संक्रमन काळाने ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आली आहे. गावातील कर वसुलीचे प्रमाण घटले आहे. ग्रामपंचायतीला आर्थिक जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावातील पथदिवे देयकासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. गावातील नागरिकांचा रोष कमी करण्याचा हाच एकमेव उपाय आहे. ग्रामपंचायत पातळीवर कर वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- राकेश मांढरे
ग्रामविकास अधिकारी, विसापूर