चिमूर : एक माणूस दुसऱ्या माणसाला मूर्ख बनवतो. सीमेवरील सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी हातात संगिन घेतो, बेडकांना मारण्यासाठी नव्हे. देशात लाखो लोक मेले, याचे कोणाला काही सोयरसूतक नाही. आपण जे पाहतो जे अनुभतो, त्याची नोंद घेता आली पाहिजे, असे मत कवी लोकनाथ यशवंत यांनी व्यक्त केले.
लुंबिनी नगर बुद्धविहार येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कविता आपल्याला कशी भेटली, हे सांगताना ते म्हणाले, मी सुरुवातीला कथा लिहून पाहिली. पण कथा लिहिणे जमले नाही. मग कवितेकडे वळलो. कमीत कमी वेळात आणि कमीत कमी ओळींत कवितेतून बरंच काही सांगता येते. मग मी कवितेलाच सर्वस्व वाहिले. दहा - बारा ओळी लिहिल्या की, कविता प्रकाश देऊन जाते. मी सुरुवातीला देशातल्या सर्वच साहित्यिकांच्या कविता वाचल्या. पण मला त्यात माझे काहीच दिसले नाही. बाबुराव बागुल, नारायण सुर्वे यांच्या साहित्यात मला माझ्या मनाचे प्रतिबिंब दिसले. माझ्या कविता महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच विद्यापिठांच्या अभ्यासक्रमात अभ्यासायला आहेत. एवढेच नव्हे तर पाकिस्तानातील विद्यापीठात कविता अभ्यासक्रमात आहे. मी जगभर फिरलो, ही सर्व कवितेची किमया आहे. कवितेसाठी तीन प्रमोशन आपण नाकारल्याचे लोकनाथ यशवंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कवी ज्ञानेश्वर नागदेवते, सुप्रसिद्ध चित्रकार संजय मोरे, प्रा. डॉ. हरिश गजभिये, प्रल्हाद बोरकर, हरी मेश्राम, सुरेश डांगे उपस्थित होते.