चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, यातून मार्ग काढत काही कुटुंबीयांनी विवाह सोहळे आयोजित केले होते. मात्र, आता पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लग्न सोहळेही अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, २५ जणांच्या उपस्थितीत कसा विवाह होईल, असा प्रश्न आता पालकांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीही पुन्हा मंगल कार्यालय संचालक तसेच यावर अवलंबून असलेले सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत.
कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ३८ हजारांवर जाऊन पोहोचली असून आतापर्यंत ५५०च्या वर रुग्णांचा बळी गेला आहे.
राज्यभरात वाढलेली रुग्णसंख्या बघता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नागरिकांना एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र, काही कुटुंबीयांनी यापूर्वीच विवाह जुळून ठेवत सर्वच तयारी केली आहे. एवढेच नाही तर मंगल कार्यालय, कॅटर्स संचालक तसेच इतरांनाही ॲडव्हान्स देऊन बुक केले आहे. मात्र, आता काय करायचे या विवंचनेत वधू-वरांकडील मंडळी पडली आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन सुरू झाला. तेव्हाही अनेक कुटुंबीयांनी आपल्याकडील विवाह सोहळे रद्द केले होते. त्यानंतर दिवाळीनंतर कोरोना संकट काही प्रमाणात घटल्यानंतर लग्न सोहळे सुरू झाले होते. यामुळे अडचणीत आलेले मंगल कार्यालय संचालक तसेच त्यावर अवलंबून असलेले इतरही घटकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकट असतानाही मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोना संकटाने तोंड वर काढले आहे. यामुळे पुन्हा सर्व व्यावसायिक अडचणीत आले असून विवाह असलेल्या कुटुंबीयांचीही चिंंता वाढली आहे.
बाॅक्स
कर्जाचा डोंगर वाढला
जिल्ह्यात विविध लाॅन, मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयाच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज घेऊन सुसज्ज मंगल कार्यालयांचे बांधकाम केले आहे. मात्र, आता लग्न समारंभरच होत नसल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, यावर अवलंबून असलेले इतरही घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचा जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.