लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : घरात सायंकाळी लग्नकार्य असल्याने, त्यासाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठी बोकडे कुटुंबातील तिघे नागभीड दुचाकीने जात होते. मात्र, परसोडी फाट्यावर एका टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीररीत्या जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लग्नकार्य होत असल्याने, आनंदात असलेल्या बोकडे परिवारावर शोककळा पसरली आहे, तर गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. भूषण श्यामराव बोकडे (२१), पवन विनोद बोकडे (१५) अशी मृतकांची नावे आहेत, तर गिरीश सुधाकर बोकडे (१६) सर्व रा.चिखलपरसोडी असे जखमीचे नाव आहे. आज म्हणजे ७ मे रोजी संध्याकाळी चिखलपरसोडी येथे बोकडे परिवारात लग्नकार्य होते. या निमित्ताने काही सामानाची खरेदी करण्यासाठी भूषण बोकडे, पवन बोकडे व गिरीश बोकडे हे तिथे दुचाकीने (एम एच ३१ डी आर १७४७) नागभीडला येत होते. परसोडी रस्त्याने नागभीडकडे दुचाकी वळवत असताना, नेमके त्याच वेळी नागपूरकडून येणाऱ्या एमएच ४० बीक्यू ५४४१ या टिप्परने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, या धडकेत भूषण आणि पवनचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीश गंभीररीत्या जखमी झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गिरीशला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले.
लग्नकार्य स्थगित - बोकडे परिवारातील एका तरुणाचे ७ मे रोजी संध्याकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील भालेश्वर येथे लग्नकार्य होते. त्यापूर्वीच मन हेलावून सोडणारी ही घटना घडल्याने हे लग्नकार्य स्थगित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, गावातील इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
अक्षता उधळण्याऐवजी धर्मकाडी वाहण्याची वेळभूषण शामराव बोकडे आणि पवन विनोद बोकडे या दोघांवर शनिवारी सायंकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकांच्या चुलतभावाचे लग्नकार्य असल्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर नवरदेवावर अक्षता उधळण्याऐवजी मृतकांच्या सरणावर धर्मकाडी वाहण्याची दुर्दैवी वेळ आली. लग्नासाठी बरीच नातेवाईक मंडळी चिखलपरसोडी येथे आली होती. सायंकाळी लग्न असल्याने दुपारी दोन वाजेदरम्यान ही पाहुणे मंडळी आणि गावकरी या लग्नासाठी भालेश्वर येथे जाणार होते. घरात सर्वत्र लगबग सुरू होती. अशातच घटनेची माहिती मिळाली. लग्नकार्य स्थगित होऊन पाहुण्यांना अंत्यसंस्कारात सहभागी व्हावे लागले.