चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य सरकारने लाॅकडाऊन केेले. सद्य:स्थितीत निर्बंध हटविण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाची दहशत कायम आहे. दरम्यान, जिल्हाभरातील आठवडी बाजारासंदर्भात अद्यापही निर्णय झाला नसतानाही काही ठिकाणी मात्र बिनदिक्कतपणे आठवडी बाजार भरत आहे. यामध्ये कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडविले जात आहे. याकडे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देणे सध्यातरी गरजेचे आहे. विशेष म्हणजे, काही तालुक्यांत अद्यापही आठवडी बाजार भरला नसून, येथे मात्र नियम पाळले जात आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला. अनेकांचा यामध्ये बळी गेला. प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊनची घोषणा केली. सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना निर्बंधातून सूट दिली आहे. असे असले तरी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सर्व व्यवहारांना सूट देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी आठवडी बाजार भरवला जात आहे. यामध्ये तेथील अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. मूल तसेेच सावली येथेही नियम धाब्यावर बसवून आठवडी बाजार भरला. यामध्ये नियमांची ऐशीतैशी झाल्याचे बघायला मिळाले. काही व्यावसायिकांनी साधा मास्कसुद्धा लावला नसल्याचे येथे बघायला मिळाले. जिल्ह्यामध्ये नागभीड येथे गुरुवारी, ब्रह्मपुरी शुक्रवारी, सिंदेवाही रविवारी, राजोली शनिवार, नांदगाव शुक्रवार, राजुरा शनिवार, कोरपना शुक्रवार, बल्लारपूर रविवार, वनसडी बुधवार आदी दिवशी बाजार भरतो. कोरपना, राजुरा, बल्लारपूर या तालुक्यांतील आठवडी बाजार आजही बंद आहे; मात्र मूल, सावली येथील बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
बाॅक्स
सावली बाजार
येथे गुरुवारी आठवडी बाजार भरतो. लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर येथील बाजार बंद होता. मात्र, प्रशासनाने सूट देताच बाजार सुरू झाला आहे. या बाजारात काही व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनीही नियम धाब्यावर बसवून दणक्यात खरेदी केली.
मूल बाजार
मूल येथे बुधवारी आठवडी बाजार भरतो. लाॅकडाऊनंतर पहिल्यांदाच बाजार भरला. यावेळी सर्वांचीच बेफिकिरी दिसून आली. प्रशासकीय आदेश नसतानाही बाजार भरला. ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
बाॅक्स
विनामास्क
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क लावणे अत्यावश्यक आहे. मात्र, व्यावसायिकांसह काही ग्राहकही बाजारात विनामास्क बिनधास्तपणे फिरताना दिसून आले. ना गर्दीची भीती, ना कोरोनाची, अशीच त्यांची अवस्था होती.
बाॅक्स
ना सोशल डिस्टन्सिंग
गर्दीच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होते. त्यामुळे गर्दी टाळणे गरजेचे आहे. मात्र, मूल तसेच सावली येथील बाजारामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाला होता.
बाॅक्स
कोरोनाची भीती नाही
जिल्ह्यात कोरोनाने १ हजार ५११ नागरिकांचा जीव गेला. सद्य:स्थितीत सातशेच्या वर नागरिक कोरोनाने बाधित आहेत. असे असतानाही नागरिकांना कोरोनाची भीती दिसून येत नाही. आठवडी बाजारात ते बिनधास्त फिरताना दिसून आले.
बाॅक्स
विक्रेतेही बेफिकीर
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शासनाने व्यवहार करण्यासाठी सूट दिली आहे. असे असले तरी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच व्यवसाय करण्यासाठी सूट आहे. आठवडी बाजारासंदर्भात अद्यापतरी प्रशासकीय स्तरावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, विक्रेते बेफिकीर होऊन व्यवसाय करताना दिसून आले.
बाॅक्स
अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही
जिल्ह्यात आठवडी बाजारासंदर्भात प्रशासकीय स्तरावर अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. असे असतानाही काही ठिकाणी आठवडी बाजार भरत आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.