चंद्रपूर : ब्रेक द चेन अंतर्गत विकेड लाॅकडाऊन करण्यात आला. शनिवारनंतर रविवारीही चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळाला. प्रत्येक चौकांमध्ये पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त होता. रुग्णसंख्या बघता मरण्यापेक्षा लाॅकडाऊन करा, अशी जनसामान्यांची भावना आजच्या विकेंड लाॅकडाऊनवरून बघायला मिळाली. दरम्यान, तालुकास्तरावरही हा विकेंड लाॅकडाऊन यशस्वी झाला. मात्र कोरोना रुग्णसंख्या थोपविण्यास कुठपर्यंत यश येते ही येणारी वेळच सांगणार आहे.
जिल्ह्यात रुग्णसंख्या ३३ हजार ५२९ वर पोहचली आहे. वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने विकेंड लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण करून अंमलबजावणी सुरु केली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस तसेच महापालिका प्रशासनाने यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू केले. त्यातच काहीजण सोडता नागरिकांनी मनावर घेत घरातच राहणे पसंत केले आहे. विशेष म्हणजे, काही व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनला विरोध केला होता. मात्र रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठेसह गल्लोगल्लीतील सर्वच व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवत कोरोना महामारीला रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. दरम्यान, महामंडळाच्या दुसऱ्या दिवशीही बस बंद होत्या. तर मालवाहतूक सुरु ठेवण्यात आली होती.
बाॅक्स
सकाळपासून पोलीस बंदोबस्त
रविवारी सकाळपासून पोलिसांनी सर्वच चौकात बंदोबस्त वाढविला होता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकांना हटकले जात होते. कारण नसताना फिरणाऱ्याला घरी पाठविले जात होते. येथील रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन यादव हे आपल्या ताफ्यासह रविवारी सकाळीच वडगाव चौकात उभे राहून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. तर चंद्रपूर शहर पोलिसांनीही चौकात बंदोबस्त ठेवला होता.
बाॅक्स
मालवाहतूक सुरू
रविवार असल्यामुळे शहरातील बाजारपेठ तशीही बंदच असते. त्यातच कोरोना संकटामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांनी घराबाहेर न निघणेच पसंत केले. विकेंड लाॅकडाऊनमध्ये वाहतूक करण्यावर निर्बंध नसल्यामुळे मालवाहतूक सुरु होती. मात्र याकडे पथक लक्ष ठेवून होते.
बाॅक्स
भाजी, दूध विक्रेते आलेच नाही
चंद्रपूर शहराजवळील काही गावातील शेतकऱ्यांसह काही नागरिक भाजीपाला, दूध विक्री करून उदरनिर्वाह करतात. मात्र शनिवार तसेच रविवारी त्यांनी नुकसान सहन करीत कोरोना संकटाला थोपविण्यासाठी येण्याचे टाळले.