वाहतुकीला मोठा अडथळा : नगरपंचायतीचे दुर्लक्ष
सावली : सावली येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. परंतु येथे अधिकृत जागा उपलब्ध नाही. रस्त्यावर बाजार बसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे ग्राहक, विक्रेते आणि वाहतूकदार यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सावली येथे नगरपंचायत स्थापित होऊन सहा वर्षे झाली. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता येथील आठवडी बाजार अधिकृत जागेत बसणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्येक आठवड्यात रस्त्यावरच बसत असल्याने अनेकांना नाहक त्रास होत आहे. येथे ग्रामपंचायत अस्तित्वात असताना सुमारे २० वर्षांपूर्वी आठवडी बाजारासाठी दोन एकर जागा घेण्यात आली. त्या जागेवर ओट्यांचे बांधकामही करण्यात आले. काही दिवस बाजारही बसवण्यात आला. मात्र रस्त्याचे कारण पुढे करून बाजार बसविणे बंद करण्यात आले. ते आजतागायत बंदच आहे.
बॉक्स
बाजारांच्या ओट्यांवर डम्पिंग यार्ड
बाजाराच्या अधिकृत जागेवर बांधकाम झालेल्या ओट्यांकडे दुर्लक्ष झाल्याने ते क्षतिग्रस्त झाले आहेत. शिवाय नगरपंचायत प्रशासनाने तेथे डम्पिंग यार्ड सुरू केला आहे. त्यामुळे आठवडी बाजारासाठी जागा असूनही रस्त्यावर बाजार बसवावा लागत आहे.
बॉक्स
वाहतुकीची कोंडी
चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग आणि सावली हरांबा या दोन्ही मार्गावर हा बाजार बसत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडले आहेत. तर अनेकांचे भांडण झाले आहे. ज्या जागेवर आठवडी बाजार बसतो, ती जागा जलसंपदा विभागाची असल्याने भविष्यात अडचण निर्माण होणार आहे. शिवाय बहुतेक शासकीय कार्यालये याच परिसरात असल्याने रस्त्यावरील गर्दीने कर्मचारी व अधिकारी वर्ग तातडीने सेवा देण्यास अडथळे निर्माण होत आहेत. ग्रामीण रुग्णालय सुद्धा लगतच आहे. या संपूर्ण बाबींचा विचार केल्यास आठवडी बाजार आपल्या अधिकृत जागेवरच बसवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
250721\20210723_103731_hdr.jpg
अनधीकृत जागेवरील आठवडी बाजाराची अवस्था