लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : विठ्ठलवाडा येथील वृंदावन जिनिंगमध्ये वजन काट्यात तफावत आढळल्याने सोमवारी (दि. ६) सकाळी शेतकऱ्यांनी आक्रोश करीत कापूस खरेदी बंद पाडली. दरम्यान, जिनिंगची सीसीआय मान्यता रद्द करण्यासह संबंधितांवर कठोर कारवाई करावी, आजपर्यंत विकण्यात आलेल्या कापसाची शेतकऱ्यांना तफावतीची रक्कम अदा करावी यासह अन्य मागण्यांना घेऊन शेतकऱ्यांनी चंद्रपूर- आष्टी राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांचा मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांसह, महसूल अधिकारी, वजनमापे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण निवाळण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याचे बघायला मिळाले.
विठ्ठलवाडा परिसरात असलेल्या वृंदावन या सीसीआय खरेदी केंद्रात सोमवारी एमएच ३४ एबी ३७७३ या वाहनामध्ये नीलकंठ गिरसावडे यांनी कापूस विक्रीसाठी आणला होता. मात्र त्यांना कापसाच्या वजनामध्ये एक क्विंटल ६० किलोची तफावत आढळली. त्यानंतर भिमणी येथील शेतकरी आनंद पिंपळशेंडे यांनी एमएच ३४ एबी ७७४५ या वाहनाने कापूस आणला होता. त्यांनाही ५५ किलो तफावत आढळली. शंका आल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे वजन दुसऱ्यांदा करण्याची विनंती केली. मात्र मोठी तफावत आढळल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी जिनिंगमध्ये कापसाची खरेदी बंद केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसाच्या उपस्थितीत पुन्हा मोजणी करण्यात आली. मात्र तफावत आढळल्याने शेतकरी आक्रमक झाले. यावेळी जिनिंग मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसह, मान्यता रद्द करावी, आजपर्यंत झालेली शेतकऱ्यांची लूट भरून द्यावी या मागण्या करण्यात आल्या. मात्र तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी दुपारी १ वाजेपासून चंद्रपूर-आष्टी राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून पोलिस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे, पोलिस उपनिरीक्षक मनोहर मोगरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलिस निरीक्षक राजकमल वाघमारे, तहसीलदार शुभम बहाकर, नायब तहसीलदार चांदेकर घटनास्थळी पोहोचले. कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार, ठाणेदार, बाजार समिती सभापती इंद्रपाल धुडसे यांच्याकडे केली. सीसीआय खरेदीची मान्यता रद्द न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, वैधमापन शास्त्र विभागाचे अधिकारी तोंडरे, उपनियंत्रक मोरे, निरीक्षक रवी शिंदे यांनी जिनिंगवर पोहोचून काट्याची चौकशी केली. त्यानंतर वजन काटा जप्त करण्यात आला आहे.
जिनिंग मालकावर कारवाईचे आश्वासन या जिनिंगमधील वनज काटा वैधमापन विभागाने जप्त केला. यावेळी त्यांनाही तफावत असल्याचे आढळून आले. दरम्यान, वजनमापे विभागाने जिनिंग मालकावर खटला दाखल केला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
"काटा इलेक्ट्रॉनिक असल्याने तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा काटा हँग झाला असावा. काट्यामध्ये कुठलेही सेटिंग किवा तफावत नाही. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय केलेला नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत." - सौरभ अग्रवाल, वृंदावन, जिनिंग मालक
"धर्मकाट्यात ५५ किलो तफावत आढळल्याची घटना माझ्या समक्ष घडली. वैधमापन अधिकाऱ्यांनी पारदर्शक चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा."- इंद्रपाल धुडसे, सभापती, बाजार समिती, गोंडपिपरी