रामू तिवारी : अनियमिततेच्या चौकशीचे प्रकरणचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेकडून पंचशताब्दी निधीअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये कथितरित्या झालेल्या अनियमिततेच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू झालेल्या गुप्त चौकशीचे आम्ही स्वागतच करतो, ही चौकशी जलदगतीने व्हावी आणि प्रकरणातील सत्यता जनतेसमोर आणावी, अशी प्रतिक्रिया मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक रामू तिवारी यांनी व्यक्त केली आहे.नंदू नागरकर यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चंद्रपूर महानगर पालिकेतील कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेसंदर्थात गुप्त चौकशी सुरू झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. त्यावर रामू तिवारी यांनी एका पत्रकातून आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. या चौकशीला आपले संपूर्ण सहकार्य देण्याची भूमिका त्यांनी पत्रकातून स्पष्ट केली आहे. दीर्घकालिन चालणाऱ्या या चौकशीच्या जलद कारवाईसाठी विशेष अधिकारी नेमून जलदगतीने चौकशी व्हावी आणि कथित गैरप्रकारातील सत्य जनतेसमोर मांडले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. २०१२ ते २०१४ या काळात महानगर पालिकेने आयोजित केलेला पंचशताब्दी महोत्सव आणि महापौर चषक, कम्पोस्ट डेपो घनकचऱ्याच्या व्यवस्थेसाठी दिलेले कंत्राट, पंचशताब्दी निमित्त विकास कामांसाठी मंजूर झालेल्या २५ कोटी रूपयांच्या पहिला टप्प्यातून पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी दिलेल्या कंत्राटातील घोळ, जाहिरात फलकांच्या निविदांमधील अनियमितता, वृत्तपत्रांच्या रोस्टरमध्ये अनियमितता, सिमेंट रस्त्यांची बेकायदेशिर निविदा, निकृष्ठ कामांच्या देयकांना मंजुरी आदी तक्रारींचा यात समावेश असून त्यासंदर्भात ही चौकशी सुरु आहे.ही चौकशी तात्काळ व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, अशी अपेक्षा तिवारी यांनी पत्रकातून व्यक्त केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
एसीबीकडून होणाऱ्या चौकशीचे स्वागतच
By admin | Published: June 10, 2016 1:03 AM