चंद्रपूर : सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करतानाच अनेकांनी नवी स्वप्न, नवी दिशा, नवी आशा, विविध संकल्प केले आहेत. अनेकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सहकुटुंब थर्टीफर्स्टचा आनंद लुटला. दरम्यान, नवीन वर्षाचा पहिला दिवस नागरिकांनी देवदर्शन, पर्यटन करून मोठ्या उत्साहात साजरा केला. विशेषत: महाकाली मंदिर, साईबाबा मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळाली.
२०२२ मधील अखेरच्या दिवशी थर्टीफर्स्टही मोठ्या उत्साहात करण्यात आला. शहरातील विविध हाॅटेल, तसेच काही तरुणांनी चौकांमध्येही रोषणाई केली होती. हाॅटेल व्यावसायिकांनी विशेष पॅकेजची ऑफर दिली होती. या हाॅटेल, रेस्टारंटमध्ये तरुणांनी थर्टीफर्स्ट तसेच नवीन वर्षाचे जल्लाेषात स्वागत केले.
महाकाली मंदिर, सोमनाथ पर्यटनस्थळ, माणिकगड पहाड, एपीजे अब्दुल कलाम गार्डन आदी ठिकाणी वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली.
दानधर्म करून नवीन वर्षाची सुरुवात
२०२३ च्या पहिल्या दिवसाची सुरुवात अनेकांनी दानधर्म, नवीन संकल्प करून तसेच मंदिरात दर्शन घेऊन केली. काहींनी गरिबांना ब्लॅंकेट, बिस्कीट पुडे तसेच मिठाई वाटली. विशेष म्हणजे, मंदिर परिसरामध्ये पहाटेपासून गर्दी बघायला मिळाली.
पर्यटनस्थळांवर गर्दी
नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी पर्यटनस्थळी भेट देऊन केली. सोमनाथ, माणिकगड पहाड, जिवती पहाड, चंद्रपूर, बल्लारपूर येथील विविध ठिकाणी काहींनी भेट दिली. विशेषत: शेती, पर्यटन, गार्डनमध्ये अनेकांनी जात नवीन वर्षाचे स्वागत अगदी आनंदात केले.