अमोद गौरकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विहिरीत पडलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला वाचविण्यासाठी पित्याने पोहता येत नसतानाही उडी घेतली. बापलेक दोघेही विहिरीत गटांगळ्या खावू लागले. ही बाब गस्तीवर असलेल्या एका पोलीस शिपायाच्या लक्षात येताच त्याने जीवाची बाजी लावत सुमारे ३५ फूट खोल विहिरीत उडी मारून बापलेकीचे प्राण वाचविले. चित्रपटात बघायला मिळणारी ही चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे शुक्रवारी रात्रीला घडली. या घटनेचा शेवट सुखद झाल्याने शिपाई परमेश्वर नागरगोचे हे या वास्तव घटनेचे हिरो ठरले आहे. चिमुकलीवर नागभीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.शंकरपूर येथील रहिवासी प्रभाकर बारेकर (२७) हे आपल्या अडीच वर्षाची मुलगी शिवण्यासोबत विहिरीच्या काटावर बसून खेळत होते. खेळताना मुलीचा तोल जाऊन मुलगी पाण्यात पडली. तीला वाचवण्यासाठी वडिलाने विहिरीत उडी घेतली. परंतु त्याला पोहता येत नव्हते. विहीर ३५ फूट खोल असून त्यात त्यात १५ फूट पाणी असल्याने दोघेही पाण्यात गटांगळ््या घेऊ लागले. पिता पुत्रीचे नशीब बलवत्तर होते म्हणून तेथूनच सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे आपल्या पोलीस कर्मचा?्यांसोबत रात्रपाळीची गस्त करीत होते. विहिरीजवळ जमलेली गर्दी बघून त्यांनी वाहन थांबवून चौकशी केली असता वडील व चिमुकली विहिरीत गटांगळ्या खात होते. हे दृश्य बघताच सोबत असलेले पोलीस शिपाई परमेश्वर नागरगोचे यांनी क्षणाचाही विचार न करता खोल विहिरीत उडी घेतली आणि बापलेकीला वाचविले. गावक?्यांच्या मदतीने तिघेही विहिरीतून बाहेर निघाले. पोलीस वाहनाने त्यांना शंकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून चिमुकलीला नागभीडला खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना कायदा व सुव्यवस्था संभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस शिपाई नागरगोचे यांनी बापलेकीचे चे प्राण वाचवून पोलीस विभागाची मान गौरवाने ताठ केली. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाब्बास! ३५ फूट खोल विहिरीत उडी मारून वाचविले बापलेकीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 1:03 PM
विहिरीत पडलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला वाचविण्यासाठी पित्याने पोहता येत नसतानाही उडी घेतली. ही बाब गस्तीवर असलेल्या एका पोलीस शिपायाच्या लक्षात येताच त्याने जीवाची बाजी लावत सुमारे ३५ फूट खोल विहिरीत उडी मारून बापलेकीचे प्राण वाचविले. चित्रपटात बघायला मिळणारी ही चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे शुक्रवारी रात्रीला घडली.
ठळक मुद्देचिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील घटना