चंद्रपूर : "सुरुवातीपासून सांगतो आहे या भागातील झुडपी काढा, परिसर मोकळा करा. आता वाघाने या झुडपांचा आधार घेतलाय. नागरिक मोर्चे काढत असतील तर त्यांचे काय चुकले? आधीच वनविभाग, वकोली प्रशासनाने लक्ष दिले असते तर हे हल्ले झाले नसते. चंद्रपूर शहरालगतच्या पाच किमी परिसरात वाढलेली झुडपी आणि कचरा काढून टाका. कृती दिसली नाही तर आम्ही ॲक्शनवर येऊ," असा सज्जड दम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
चंद्रपूर वीज केंद्रातील विश्रामगृहात सोमवारी अचानक पालकमंत्र्यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून या भागात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यामुळे पसरलेली दहशत संपविण्याबाबत बैठक बोलाविली होती. यावेळी उपस्थित एकाही अधिकाऱ्यांकडे पालकमंत्र्यांच्या प्रश्नावर समर्पक उत्तर नव्हती. पालकमंत्री कडक भूमिकेत होते. त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्यात. या सूचनांचे पालन झाले नाही तर कारवाई करण्यासही मागे-पुढे पाहणार नाही, अशा शब्दांत सुनावले.
वेकोलीमुळे हे घडतंय
वेकोलीने कोळसा काढण्यासाठी माती काढली आणि ढिगारे उभे करून ठेवले. ती माती कोळसा काढल्यानंतर पडलेल्या खड्ड्यात टाकली असती तर हे ढिगारे दिसले नसते. आता येथे झाडेझुडपे वाढली आहेत, तीही स्वच्छ केली नाहीत. या झुडपांचा फायदा वाघ व बिबट्या घेताेय, ही बाबही पालकमंत्र्यांनी अधोरेखित केली.
नागरिकांना टोल फ्रीनंबर द्या
वाघ दिसताच टोल फ्री नंबरच्या माध्यमातून वनविभागाला कोणीही लगेच वाघाच्या हालचालींची माहिती देऊ शकेल.
वनविभागाने सुरक्षा वाढवावी
या भागात नागरिकांच्या जीवितास वाघामुळे धोका होऊ नये, यासाठी वनविभागाने या भागात सुरक्षा वाढवावी.
पाच किमी परिसरातील झुडपी लगेच काढा
ऊर्जानगर, दुर्गापूर आणि लागूनच चंद्रपूर शहराचा परिसर आहे. वाघांना लपण्यासाठी झुडपी आहे. तो जंगलात जात नाही. वाघांचा येण्याचा मार्गच बंद झाला तर तो येणार नाही. यासाठी पाच किमी परिसरातील झुडपी लगेच हटवावी. चंद्रपूर शहरालगतची झुडपी काढावी. हे काम तातडीने करावे, अशा सूचनाही यावेळी मंत्री वडेट्टीवार यांनी दिल्या.
बिबट्यासाठी ३ पिंजरे, वाघासाठी शार्प शूटर
बिबट्याला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावण्यात आले आहेत. वाघाला जेरबंद करण्यालाठी शार्प शूटर तैनात करण्यात आला असल्याची माहिती वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी पालकमंत्र्यांना दिली.