अमोद गौरकर
चंद्रपूर : तुम्ही आधार कार्ड काढले अन् त्यावर तुमच्या फोटोऐवजी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून आला तर...? आहे ना गंमत. अशीच गंमत सिंदेवाही तालुक्यातील एका चिमुकल्यासोबत घडली. विशेष म्हणजे चक्क सात वर्षांपासून हा फोटो जसाच्या तसा आहे. चिमुकल्याचे नाव आहे जिगल जीवन सावसाकडे (विरव्हा, ता. सिंदेवाही) अन् आधारवर ज्यांचा फोटो आहे, ते आहेत तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. याच आधार कार्डवर मुलाला शाळेत प्रवेशही मिळाला आहे.
जिगलच्या आईने सात वर्षांपूर्वी मुलाचे आधारकार्ड काढले. त्यावर मुलाच्या फोटोऐवजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा फोटो आला. ही चूक तेव्हाच आईच्या लक्षात आली. मात्र अपडेट करण्याच्या घोळमध्ये सात वर्षांपासून मुलाच्या आधारवर चक्क उपमुख्यमंत्र्यांचाच फोटो आहे. एवढेच नाही तर शाळेतसुद्धा याच आधार कार्डवर प्रवेशही घेण्यात आला. या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी मुलाच्या आईने आधार केंद्रामध्ये चकरा मारणे सुरू केले आहे.
जिगलचा जन्म आजोळी शंकरपूर (ता. चिमूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २०१५ रोजी झाला. आईचे माहेर शंकरपूरजवळील शिवरा येथील आहे. शंकरपूर येथे आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जिगलचे आधार कार्ड काढले. आधार घरी आले, तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
शासकीय काम अन...
मुलाच्या आईने हा फोटो बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे आजही फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. पाच वर्षांनंतर मुलाचे आधारकार्ड अपडेट करावे लागत असल्याची माहिती जिगलच्या आईला मिळाल्यानंतर आता तिने पुन्हा आधार कार्ड अपडेटसाठी प्रयत्न सुरू केले. जन्मदाखल्यासाठी शंकरपूर ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आहे.