लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या उत्परिवर्तनामुळे ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यादृष्टीने आता जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुका आरोग्य यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देऊन उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, आता पुन्हा ओमायक्राॅनचा प्रसार सुरू झाल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. बाहेरच्या देशातून येणाऱ्या नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. जिल्ह्यात येताच त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन ठेवण्यात येत आहे. त्यानंतर आठव्या दिवशी दुसरी आरटीपीसीआर चाचणी करून पुन्हा क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी तो पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याचे नमुने तपासणीसाठी दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे. यासोबतच ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था करण्यात येत आहे. १२२ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध राहील या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या चाचण्या वाढविल्या असून, लसीकरणही वाढविण्यात आले आहे.
परदेशातून आलेल्यांचे अहवाल निगेटिव्हचंद्रपूर जिल्ह्यात परदेशातून एकूण २२ जण आले. त्या सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहे
जिल्हाभरात १७ ऑक्सिजन प्लांटओमायक्रॉनच्या संसर्गाची गती अधिक आहे. त्या दृष्टिकोनातून तालुका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात एकूण १६ ऑक्सिजन जनरेशन प्लांट तयार करण्यात आले आहेत. तसेच चंद्रपूर येथील नव्या मेडिकल कॉलेजमध्ये एअर सेप्रेशन युनिट तयार करण्यात येत आहे. यासोबतच महिला रुग्णालय जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पीएमसी प्लांट तसेच ट्रायमेट्रिक टॅंक असे २० किलोलिटरचे दोन टॅंक तसेच ब्रह्मपुरी व जीएमसीमध्ये १० किलोलिटरचे तीन टॅंक बसविले आहेत. त्यामुळे ७२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध राहणार आहे. १२२ मॅट्रिक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध राहावा, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
ओमायक्रॉनची लक्षणे काय?- ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. सध्या ओमायक्रॉनचे जे रुग्ण सापडले, त्यांच्यामध्ये दुसऱ्या लाटेप्रमाणे तीव्र स्वरूपाची लक्षणे नाहीत. मात्र ताप, सर्दी, अंगदुखी अशी साधी लक्षणे आढळून येत आहेत. - ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक असल्याने तो अधिक वेगाने पसरत असल्याने त्याचा धोका अधिक आहे.
कोविड केअर सेंटर पुनरुज्जीवित करणारnजिल्ह्यात ३१ कोविड केअर सेंटर होते. मात्र, त्यांना डिॲक्टिव्ह करण्यात आले होते. nसद्य:स्थितीत केवळ आसरा येथीलच केंद्र ॲक्टिव्ह आहे. मात्र, आता सर्व कोविड केअर सेंटर ॲक्टिव्ह करण्यात येणार आहेत. येथे साधारणत: ३२०० बेडची व्यवस्था आहे. यासोबतच कोरोनाकाळात सेवा दिलेल्या सर्व डॉक्टर, परिचारिका यांची यादी आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
ओमायक्रॉन पसरण्याची गती अधिक आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन साठा उपलब्ध असावा, अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. १२२ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध असावा यासाठी १७ प्लांट तयार करण्यात आले आहेत. सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था केली आहे. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी कापडी मास्क न वापरता एन ९५ मास्क वापरावा. - डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर