जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात २०० केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, जिल्ह्यासाठी पुरेसे डोस येत नसल्याने ६० वर्षांवरील व सहव्याधींसह ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दुसरा बुस्टर घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा डोस चुकू नये, यासाठी सकाळी आठ वाजतापासूनच रांगा लावणे सुरू झाले. मात्र, प्रत्येक केंद्राला सुमारे १०० ते १५० लस मिळत असल्याने काहींना रांगेत राहूनही परत जावे लागत आहे.
जिल्ह्यासाठी एक लाख डोस मागविले जात आहेत. मात्र, आजपर्यंत मागणीनुसार कधीच डोस मिळाले नाहीत. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढवूनही आठवड्यातून पाच दिवस बंद ठेवावे लागत आहे.
जिल्ह्यातील पॉझिटिव्ह संख्या व संसर्गाचा वेग आदी बाबींचा विचार करून डोस मंजूर केले पाहिजेत. परंतु, राज्यांना डोस देण्याचे निकष केंद्र सरकारने तयारच केले नाहीत.
बुस्टर डोस घेणाऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पहिला डोस घेणाऱ्यांना दोन दिवसांनंतर येण्याची सूचना देता येऊ शकते. मात्र, बुस्टर घेणाऱ्यांबाबत हे शक्य नाही.
असे आहे १ मेनंतरचे नियोजन
६० वर्षांपुढील २२४२९६, ४५ ते ६० वर्षे ४४८५८६, २५ ते ४४ वर्षांतील ६८४२९६ आणि १८ ते २४ वयोगटातील २८४८५२ असे एकूण १६ लाख ४१ हजार ८२९ नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी सुमारे ३५० केंद्रे निश्चित करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
चंद्रपूर मनपा क्षेत्रात सुमारे २ लाख ६२ हजार पात्र नागरिकांना लस देण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक प्रभागात वाढीव केंद्र उभारण्यात येईल. १ मेपासून ३५ केंद्रे सुरू करण्याचे नियोजन मनपाने तयार ठेवले आहे.
अडचणींवर मात करण्याची प्रशासनाची तयारी
पुरेसे डोस मिळत नसल्याने काही नागरिकांना दुसऱ्या दिवशी केंद्रात यावे लागत आहे. १ मार्चपासून असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्राधान्य गटाकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. लस कमी मिळाले तरी नोंदणी केलेल्या नागरिकांना सहजपणे डोस मिळेल, यादृष्टीने तयारी सुरू असल्याचा दावा जिल्हा आरोग्य प्रशासनाने केला आहे.