छायाचित्र : ठाण्यात उभा असलेला हाच तो गव्हाचा ट्रक.
गोंडपिपरी : गोंडपिपरी पोलिसांनी गेल्या गुरुवारी गहू घेऊन जाणारा एक ट्रक पडकला. हा ट्रक मूल येथून गोंडपिपरीमार्गे तेलंगणातील हैद्राबाद येथे गव्हाची तस्करी करणार होता, अशी माहिती पुढे आली आहे. हा ट्रक गोंडपिपरी पोलिसांनी पकडून ठाण्यात उभा केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. पोलीस यासंदर्भात अधिक चौकशी करत आहेत.
गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. या भागातून मोठ्या प्रमाणावर तेलंगणात व तेलंगणातून महाराष्ट्रात तस्करी होते. अशातच दि. ३ जूनला रात्री मूल तालुक्यातील गोवर्धन येथून ट्रक क्र. एपी १० वी ९४६७ गहू घेऊन तेलंगणातील हैदराबाद शहराकडे जात असताना काही जणांनी तो पकडला. पुरवठा निरीक्षक संघपाल मेश्राम यांना पाचारण केले. पुरवठा निरीक्षक मेश्राम यांनी चौकशीअंती गोंडपिपरी तहसीलदार के. डी. मेश्राम यांना माहिती दिली. तहसीलदार मेश्राम यांनी वाहन पोलीस ठाण्यात लावण्याचे आदेश दिले. ठाणेदार धोबे यांना यासंबंधीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे.
कोट
मुबलक प्रमाणात गहू साठा भरलेला ट्रक हा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना संबंधित गहू साठ्याची परिपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अहवाल प्राप्त होताच अहवालाला अनुसरून निश्चितच कारवाई करण्यात येईल.
के. डी. मेश्राम, तहसीलदार गोंडपिपरी