डॉक्टरांनी मारली दांडी : जिल्हा रुग्णालयातील प्रकारचंद्रपूर : जिल्हा सामान्य रूग्णालयातील बेजबाबदारपणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना गुरूवारी त्यात पुन्हा नव्याने भर पडली. मृतदेहांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी ऐन वेळी दांडी मारल्याने अखेर खुद्द निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून दोन मृतदेहांचे शवविच्छेदन केले.शवविच्छेदनगृहामध्ये गुरूवारी डॉ. साहिल ढोबळे यांची सकाळी ८ वाजता ड्युटी होती. ते कामावर हजरही झाले. त्यानंतर दुपारी २ वाजतादरम्यान ते बाहेर गेले. त्यानंतर सायंकाळपर्यंत परतले नाहीत. मात्र शवविच्छेदनगृहात तीन मृतदेह पडून होते. सर्पदंशाने मृत्यू झालेली वणी येथील आशा आत्राम, रेल्वेने कटून मृत्यू झालेला देवा रंगारी आणि बल्लारपूर बस स्थानकावर सापडलेले एक अज्ञात शव असे तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी पडून होते. सकाळपासून प्रतिक्षा करणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना डॉक्टरच हजर नसल्याचे कळल्यावर त्यांच्या संयमाचा बांध सुटला. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास त्यांनी रूग्णालय परिसरातच राहणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुनघाटे यांच्या निवासस्थानी आपला मोर्चा वळविला. प्रचंड आरडाओरड सुरू केली. अखेर रूग्णालयातील पोलीस चौकीतील पोलिसांना मध्यस्ती करून वातावरण शांत करावे लागले. डॉ. मुनघाटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि नातेवाईकांची अडचण लक्षात घेवून स्वत: शवविच्छेदन करण्याची तयारी दर्शविली. शवविच्छेदनगृहात हजर होऊन त्यांनी शवविच्छेदनही पार पाडले. तेव्हा कुठे नातेवाईक शांत झाले. (जिल्हा प्रतिनिधी)
आरएमओ शवविच्छेदन करतात तेव्हा !
By admin | Published: August 21, 2014 11:46 PM