विनायक येसेकर
भद्रावती : कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत पित्याचे छत्र हरपलेल्या एका मतिमंद मुलाची दररोज एकच हाक असते, ती म्हणजे आई, बाबा घरी कधी येणार? बाबा दवाखान्यातच आहे, एवढेच या मुलाला माहीत आहे. कोरोनामुळे निधन झाल्याने अंत्यसंस्कार दवाखान्यातूनच परस्पर बाहेर उरकण्यात आले. मुलगा मतिमंद असल्याने बाबा कधी येणार, या प्रश्नाचे उत्तर आई देऊ शकत नाही. मुलांची समजूत कशी काढणार, हा प्रश्न त्या मातेसमोर आहे.
कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. काही उद्ध्वस्त झाले. भद्रावती येथील आहे कवडू अराडे (वय ४७) यांचे २९ एप्रिलला कोरोनामुळे निधन झाले. कवडू हे वेकोली येथे कार्यरत होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. सतरा वर्षांचा मुलगा असून, तो जन्मताच मतिमंद आहे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्यावर ते प्रेम करायचे. तोसुद्धा आई-वडिलांसोबत नीटनेटका बोलत असल्याने त्याला इतर मतिमंद विद्यालयातसुद्धा पाठविण्यात आले नाही. त्याची संपूर्ण देखभाल आई-वडीलच करायचे. २८ एप्रिलला कवडू यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चंद्रपूर येथील वेकोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी प्रवीणसुद्धा त्यांच्या सोबत होता. वडिलांची प्रकृती बिघडली असल्याचे त्याला ठाऊक होते. त्यातच एक दिवसानंतर वडिलांचे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कारसुद्धा बाहेरच करण्यात आले. घरात मुलगी, आई व आजी राहत असल्याने आईची प्रकृतीसुद्धा ठीक राहत नाही. त्यातच प्रवीण हा मतिमंद असल्याने या परिवारावर डोंगर कोसळला आहे.
निधनाला दीड महिना लोटला असताना प्रवीण हा दररोज आजीला, आईला ‘बाबा घरी कधी येणार, त्यांना फोन लावा, नाहीतर आपण त्यांना घेऊन येऊ’, असे सतत तगादा लावत असतो. त्याच्या या बोलण्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांचेही अश्रू अनावर होते.