नवीन एक्स-रे मशीनही धूळखात : वरिष्ठांचे दुर्लक्ष
सिंदेवाही : येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना सर्व आरोग्यविषयक आवश्यक सेवा मिळाव्यात, यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली. पण कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे सांगत नवीन एक्स-रे मशीन मागील दोन महिन्यांपासून धूळखात पडून आहे. तसेच आणखी अनेक असुविधा असल्याची तक्रार नगरसेवक युनूस शेख यांनी केली आहे.
त्यामुळे सर्व सुविधा पूर्ववत केव्हा सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू असताना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा अभाव असणे हे दुर्दैव आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. गरोदर महिलांची तपासणी, सोनोग्राफी, प्रसूती हे नावापुरते सुरू आहे. आधीच लॉकडाऊन, रोजगार बंद असल्याने नागरिकांना पैशाची चणचण भासत आहे. ग्रामीण रुग्णालयात सेवा बंद असल्याने अबालवृद्धांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार रुग्ण समितीचे सदस्य युनूस शेख यांनी वरिष्ठांकडे केली आहे.