विरुर स्टेशन : मागील दोन वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्णत्वास होऊन अद्यापही उद्घाटनाला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे कोरोना काळात तरी हे आरोग्य केंद्र सुरू व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
राजुरा तालुक्यात येत असलेल्या विरुर स्टेशन येथे मागील दोन वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र केंव्हा सुरू होणार याची चर्चा विरुरसह अन्य परिसरात होऊ लागली आहे. रुग्णांना वेळेवर उपचार होत नसल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. विरूर स्टेशनपासून १३ किलोमीटर अंतरावर चिंचोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, परंतु सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने परिसरातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर विरुर हे गाव आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील १८ ते २० गावातील नागरिकांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक गर्भवती मातांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. येथून तालुक्याचे ठिकाण २५ किलोमीटर असल्याने नागरिकांना अपघातकालीन वेळेत खासगी डॉक्टरांचा आसरा घ्यावा लागतो. त्यामुळे सामान्य आजार जीवावर बेततात. प्रशासनाने लक्ष देऊन विरुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी विरूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कोट
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सेवेसाठी विरुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित सुरू करावे.
- ॲड. वामनराव चटप, माजी आमदार, राजुरा.
200821\img-20210819-wa0060.jpg
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत नवीन इमारत