कोरपना : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोरपना ते वणी राज्य महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहे.
सदर महामार्ग हा कोरपनावरून पुढे वणी, वरोरा, यवतमाळ, नागपूर , अमरावती, वर्धा, घुग्घुस आदी मोठ्या शहरांना जोडला आहे. त्यामुळे कोरपना परिसरातील सिमेंट , कोळसा , जिनिंग उद्योग, वणी भागातील गिट्टी खदानची जड वाहतूक व अन्य वाहतूक याच मार्गाने होते. परिणामी या मार्गावरील रेलचेल मोठ्या प्रमाणात आहे. सद्य:स्थितीत कोरपना ते कोडशी, यवतमाळ जिल्हा हद्दीतील जिल्हा सीमा ते वेळाबाई फाटा, खांदला ते चारगाव चौकी दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. मात्र त्यावर केवळ डागडुजी केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची अवस्था दोन दिवसांतच ‘जैसे थे’ होते आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु त्यालाही अत्यंत वर्दळीचा मार्ग असूनही केराचीच टोपली दाखवण्यात येत आहे. यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.