चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे जंक्शनवरून पॅसेंजरसह, सुपरफास्ट रेल्वे मोठ्या प्रमाणात धावत होत्या; परंतु चंद्रपूर येथे ३ मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. पहिल्यांदाच रेल्वेसेवा बंद करण्यात आली. त्यानंतर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. याअंतर्गत बल्लारपूर जंक्शनवरून ३० ट्रेन धावत आहेत. यामध्ये जीटी, नवजीवन, दानापूर, सिकंदराबाद, केरळ, तामिळनाडू या ट्रेन धावत आहेत; परंतु मुंबई पुण्यासाठी धावणाऱ्या ट्रेन अद्यापही बंद आहेत. काजीपेठ टू पुणे, आनंदवन एक्स्प्रेस, ताडोबा एक्स्प्रेस, बल्लारपूर सेवाग्राम एक्स्प्रेस बंद असल्याने मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यांना नागपूर येथे जाऊन ट्रेन पकडावी लागत आहे. त्यामुळे या ट्रेन कधी सुरू होतील, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
बॉक्स
पॅसेंजर गाड्यांचे घोडे कोठे अडले?
चंद्रपूर येथून वर्धा, नागपूर, गोंदिया अशा पॅसेंजर ट्रेन धावत होत्या. मात्र, कोरोनापासून त्या सर्व बंद आहेत.
इतर ट्रेन सुरू केल्या असल्या तरी पॅसेंजर ट्रेन बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.
या सर्व पॅसेंजर फुल्ल भरून धावत होत्या. कोरोनात गर्दी टाळण्यासाठी या ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत.
विशेष ट्रेन ज्या नियमावलीच्या आधारावर सुरू करण्यात आली त्याच आधारावर पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे; परंतु एक्स्प्रेस व पॅसेंजर सुरू करण्याबाबतचे निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतील, असे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बॉक्स
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
जीटी एक्स्प्रेस
गोरखपूर एक्स्प्रेस
केरला एक्स्प्रेस
तेलंगणा एक्स्प्रेस
तामिळनाडू एक्स्प्रेस
बॉक्स
या गाड्या कधी सुरू होणार
काजीपेठ पुणे
आनंदवन एक्स्प्रेस
ताडोबा एक्स्प्रेस
बल्लारपूर सेवाग्राम
बल्लारपूर गोंदिया पॅसेंजर
बॉक्स
प्रवासी काय म्हणतात
माझी मुलगी पुण्याला राहते. त्यामुळे कधी-काळी तिच्याकडे जाणे होते; परंतु मागील दोन वर्षांपासून ट्रेनच बंद आहे. त्यामुळे नागपूरला जाऊन पुण्यासाठी ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे मोठी अडचण होते. इतर ट्रेन सुरू केल्या असताना पुण्यासाठीची ट्रेन बंद का आहे, हे कळायला मार्ग नाही.
-किशोर साहू, बल्लारपूर
------
नेहमी कामानिमित्त मूलला जाणे होते. पॅसेंजर सुरू होती तर मूल गाठणे सहज व कमी खर्चिक होते. मात्र, पॅसेंजर बंद असल्याने आता बस किंवा खासगी गाडीने जावे लागते. त्यामुळे लवकर पॅसेंजर सुरू करण्यात यावी.
-गौतम काकडे, बल्लारपूर